आठवडय़ातील विरंगुळा

सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि श्रीधर फडके या तीन लोकप्रिय गायकांची एकत्रित मैफल अथर्व मल्टीक्रिएशन्सतर्फे आयोजित करण्यात आली आहे. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात शनिवार, २२ ऑगस्ट या दिवशी रात्री साडेआठ वाजता ‘सूरश्री’ हा आगळावेगळा कार्यक्रम होत आहे. गायिका सोनाली कर्णिक यांचाही यात सहभाग आहे. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते विघ्नेश जोशी करणार आहेत. संपर्क – मंदार कर्णिक ९८२०७५७४३५.

अमृता-साहिरची ‘एक मुलाकात’
बंडखोर शायर साहिर लुधियानवी आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची असफल प्रेमकहाणी चाहत्यांना आजही चुटपूट लावून जाते. या बहुचर्चित नात्याचा आढावा घेणारी ‘एक मुलाकात’ ही नाटिका ‘लोटस लीफ एंटरटेनमेंट’ संस्थेतर्फे ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात शुक्रवार, २८ ऑगस्ट या दिवशी रात्री ८.३० वाजता होत आहे. दीप्ती नवल व शेखर सुमन या कसलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका हे या प्रयोगाचे वैशिष्टय़ आहे. सैफ हैदर हसन यांनी या नाटिकेचे लेखन
(सहलेखन सुम्मना अहमद ) व दिग्दर्शन केले आहे. या प्रयोगाच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी तसेच ‘बूकमायशो’वर उपलब्ध आहेत.

‘सावन की फुहार’
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या इंडियन म्युझिक ग्रुपतर्फे शनिवार, २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ‘सावन की फुहार’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रॅमी पारितोषिक विजेते सारंगीवादक पं. ध्रुव घोष यांच्या एकल वादनाने मैफलीला सुरुवात होणार आहे. योगेश समसी त्यांना तबल्यावर साथसंगत करणार आहेत. त्यानंतर ठुमरी गायिका धनश्री पंडित राय यांचे गायन ऐकायला मिळणार आहे. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमींसाठी खुला आहे.
‘मला भेटलेले लीजंड्स’
सूत्रधार या संस्थेतर्फे द्वारकानाथ संझगिरी यांचा ‘मला भेटलेले लीजंड्स’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयाच्या वातानुकूलीत सभागृहात शुक्रवार, २८ ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता हा कार्यक्रम होत आहे. संझगिरी हे यावेळी दृक-श्राव्य माध्यमाच्या आधारे बाळासाहेब ठाकरे, देव आनंद, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आदी दिग्गजांची व्यक्तिमत्त्वे उलगडणार आहेत. संपर्क- ९८१९३४०१४६.
‘मग्न’
चित्रकार स्नेहल पागे यांच्या चित्रांचे ‘मग्न’ हे प्रदर्शन २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान वरळी येथील नेहरू सेंटर कला दालनात भरविण्यात येणार आहे. आपल्या आवडत्या कलमध्ये, कामामध्ये किंवा विचारांमध्ये मग्न असलेल्या व्यक्तिरेखा स्नेहल पागे यांनी या प्रदर्शनातील चित्रांमधून मांडल्या आहेत. सतारवादक विदुर महाजन, अभिनेत्री नेहा महाजन, गांधी विचारांनी प्रेरित झालेले माधव सहस्रबुद्धे यांच्या व्यक्तिरेखाही त्यांनी चित्रांतून दाखविल्या आहेत.
समूह प्रदर्शन
स्टार आर्ट ग्रुपच्या पाच तरुण कलावंतांच्या अलीकडे साकारलेल्या कलाकृतींचे समूह प्रदर्शन सध्या आर्टिस्ट सेंटर कला दालन, अॅडॉर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा येथे भरविण्यात आले आहे. जे. एस. पी. गोविंद, एस. के. कामतगौडर, एम. लक्ष्मी नारायण, एम. स्वेता आणि विवेकानंद एस. गौडासलामनी यांच्या वैविध्यपूर्ण कलाकृतींचे हे प्रदर्शन २३ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या चित्रांचे ‘प्रदेश’ हे प्रदर्शन २५ ऑगस्टपासून जहांगीर कला दालनात भरविण्यात येणार आहे. आपण कुठे कुठे फिरतो, प्रवास करतो, त्या ठिकाणांचे वातावरण, चित्रं मनात खोलवर रूतून बसतं. प्रदेशांच्या काही काही प्रतिमा वर्षांनुवर्षे मनात राहतात, काही धूसर होतात. त्या प्रदेशांच्या चित्रांचे हे प्रदर्शन आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे पाहायला मिळेल.