तोटय़ात असल्यादा दावा करणाऱ्या बेस्टची कोटय़वधी रुपयांची बिले थकली असून ती थकवणाऱ्यांमध्ये खासगी ग्राहकांबरोबरच अनेक सरकारी कार्यालये, पोलिसांचे विविध विभागही आहेत. गमतीचा भाग म्हणजे खुद्द बेस्टनेच लक्षावधींचे आपलेच बिल थकवले आहे!
वीज बिलावरून सध्या देशातले वातावरण पेटले आहे. तोटय़ात असल्याचे कारण देत बेस्टने वीज दर कमी करण्यास नकार दिला आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे बेस्टची कोटय़वधी रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र घाडगे यांनी बेस्टची वीज बिले थकविणाऱ्या ‘टॉप ३००’ थकबाकीदारांची यादी मागविली होती. ती यादी पाहिल्यावर अनेक सरकारी कार्यालये, पोलीस, रुग्णालये आदींबरोबर बेस्टनेही लाखो रुपयांची बिले थकविल्याचे समोर आले आहे. या ३०० थकबाकीदारांमध्ये पोलिसांची सुमारे २ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीतील कार्यालये, पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक कार्यालयांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील ६४ लाख १२ हजारांची वीज बिलाची थकबाकी आहे. खुद्द बेस्ट महाव्यवस्थापकांच्या नावाने निघणाऱ्या बिलांची ३८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
याबाबत जितेंद्र घाडगे यांनी सांगितले की, वीज बिलाची थकबाकी नियमित वसूल केली तरी बेस्टचा तोटा कमी होईल. वीज ग्राहकांच्या बिलात बेस्ट बसचा अधिभार लावला जातो. या ३०० थकबाकीदारांनी ४५ कोटींची बिले थकवली आहेत. ती जरी वसूल केली तरी हा अधिभार १० टक्क्यांनी कमी होऊ शकेल. मोठय़ा प्रमाणात थकबाकीदार पाहता त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात बेस्टचे प्रवक्ते ए.एस.तांबोळी यांनी सांगितले की, बेस्टच्या कार्यालयाचंी बिले ही व्यवस्थापकांच्या नावाने येतात. आम्हीच आमची बिले कशी भरणार. त्याची आम्ही बुक एण्ट्री करतो. पण त्याला विलंब होत असल्याने रक्कम मोठी दिसते.