नाना पाटोले, भंडारा-गोंदिया
काँग्रेसमधून भाजपवासी झालेले नाना पटोले आधी आमदार व गेल्या वर्षी प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव करून खासदार म्हणून निवडून आले. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) प्रश्नांच्या संदर्भात नाना नेहमीच आग्रही असतात. लोकसभेतही त्यांनी हा विषय मांडला तसेच ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे ही मागणी सातत्याने लावून धरली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचा मतदारसंघात समावेश होत असला तरी विकास कामांमध्ये दोन्ही जिल्ह्यांमध्ये समतोल राखू शकले नाहीत, अशी त्यांच्यावर टीका होते. भंडारा जिल्ह्यांकडे जास्त लक्ष देतात, असा आक्षेप त्यांच्याबद्दल घेतला जातो. सिंचनाच्या प्रश्न खासदारांनी तेवढा लावून धरलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम करण्यात काही मर्यादा आल्याचा दावा ते करतात. वर्षभराची कामगिरी तशी संमिश्रच म्हणावी लागेल.

सर्वसामान्यांचाही अपेक्षाभंग
-प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस)
गेल्या वर्षभरात नाना पटोलेंनी जिल्ह्य़ातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून सर्वसामान्यांचाही अपेक्षाभंग केला आहे. गोंदिया-भंडारा  जिल्ह्य़ासाठी यूपीएच्या काळात धानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र, यंदा साऱ्यांचाच अपेक्षाभंग झाला आहे. विरोधी पक्षात असताना धानाला २५०० रुपये प्रतिक्विंटलची मागणी करणारे आता सत्तेत असताना या विषयावर का मूग गिळून गप्प बसले आहेत याचा उलगडा होत नाही.
    
महामार्ग, पुलासाठी निधी मंजूर
वर्षभरात उत्तरप्रदेश ते आंध्रप्रदेश व्हाया गोंदिया महामार्गासाठी हजार कोटी, गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी ५०० कोटी व लाखनीच्या भेल प्रकल्पासाठी २५०० कोटी, लाखांदूर-ब्रम्हपुरी मार्गावरील पुलासाठी ७५ कोटी, तर करडी-मुंढरी ते रोहा या मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलासाठीही ४५ कोटीचा निधी आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाला. साकोली व लाखनी येथील चौपदरी महामार्गावर उड्डाणपूल व सौंदडच्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्याबाबत बरेच प्रयत्न केले आहेत.
संजय राऊत