भंडारद-याच्या पाणलोट क्षेत्राला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली तरी आठवडाभरापासून कमीजास्त पडत असणा-या पावसामुळे भंडारद-याचा पाणीसाठा २ टीएमसीपेक्षा जास्त झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील घाटघर, पांजरे, रतनवाडी या सर्वच ठिकाणी आज अडीच इंचापेक्षा अधिक पाऊस पडला. पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आठवडाभरापूर्वी मान्सूनचे पुनरागमन झाले, मात्र या भागाच्या लौकिकाला साजेसा मुसळधार पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. कालपासून पावसाचा जोर काहीसा वाढला. आज दिवसभरही पाऊस आपले सातत्य टिकवून होता. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- घाटघर ६१, पांजरे ५८, रतनवाडी ६३, भंडारदरा ३६, वाकी २९. या पावसामुळे भंडारद-याचा पाणीसाठा आता दोन टीएमसीपेक्षा जास्त झाला आहे. सायंकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा २ हजार १७ दशलक्ष घनफूट होता. मुळा खो-यातील हरिश्चंद्रगड परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सकाळी कोतूळजवळ मुळा नदीपात्रातून १ हजार ६० क्युसेक्सने पाणी वाहात होते. त्यात हळूहळू वाढ होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पूर्व भागात अकोले ८, कोतूळ २, निळवंडे ५ मिमी याप्रमाणे पाऊस पडला. दोनतीन दिवसांच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. निळवंडे धरणातही हळूहळू नवीन पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी धरणातील पाणीसाठा २३३ दलघफू होता.