सेनेत दुफळीचे चित्र
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तरीही शिवसेनेच्या आमदाराने शहरातील रेल्वे स्टेशन ते क्रांती चौकदरम्यान होणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले. आंदोलनात लिहिलेल्या घोषणा लक्षवेधक होत्या. ‘नियोजन झाले भिकार, मनपा प्रशासनाचा धिक्कार’, ‘का थांबला रस्ता, जनता खाते खस्ता’, ‘मनपाची मनमानी, सामान्यांची परेशानी’ या घोषणांसह शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आंदोलन केले आणि खापर फोडले मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकरांवर! या नियोजित रस्त्याला ‘डॉ. भापकर मार्ग’ असे नाव देण्याचा ठराव मंजूर आहे. रस्त्यासाठी कधी निधी कमी असल्याचे कारण पुढे केले गेले, तर कधी जलवाहिनी आणि विद्युत खांब हटविण्याच्या कामात अडथळे असल्याचे सांगितले गेले. रस्ताच होऊ नये, अशी व्यवस्था पालिका आयुक्त करत आहेत, अशी भूमिका घेत आमदारांनी आंदोलन केले. सत्ता असताना चर्चा करण्याऐवजी त्यांनी केलेले आंदोलन शिवसेनेतील दुफळी सांगण्यास पुरेसे ठरले.
‘डॉ. भापकर मार्गा’चे खापर आयुक्त भापकरांवर फोडून शिवसेनेचे आमदार शिरसाट यांनी एक वेगळाच गट उभा केला असल्याचे चित्र निर्माण झाले. या विषयी बोलताना ते म्हणाले, प्रश्न सत्ता कोणाची आहे, याचा नाही. तर प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन करावे लागले. आज आंदोलन केले म्हणून पुन्हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम पूर्वीच सुरू करता आले असते. मात्र, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ रस्ते खोदून थांबणे चुकीचे आहे, अशी भूमिका असल्याने आंदोलन करावे लागले. आंदोलनस्थळी आयुक्त डॉ. भापकरांनी भेट दिली आणि प्रश्न मार्गी लावला. दुसरीकडे आमदार प्रदीप जयस्वाल यांनीही त्यांच्या मतदारसंघातील कामे तातडीने हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी केली. यामुळे आमदार शिरसाट आणि जयस्वाल संघर्षांच्या पवित्र्यात आहेत काय, अशी शंका घेतली जाऊ लागली होती. मतदारसंघात कामे घ्यावीत यासाठी संघर्ष करणे रास्तच आहे, असे आमदार जयस्वाल यांनी आज स्पष्ट केले. आमदार जयस्वाल आणि आयुक्तांनी आज दिवसभरात भडकल गेट आणि चेलिपुरा भागाचा दौरा केला.
दरम्यान, दोन्हीही मतदारसंघात कामे सुरू करण्याची प्रक्रिया आयुक्त डॉ. भापकर यांना हाती घ्यावी लागली. रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक या रस्त्याची चर्चा गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. तेराव्या वित्त आयोगातून उभारावयाचा ७ कोटी रुपयांचा हा रस्ता नेहमीच वादात अडकला होता. पालिकेतील राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू बनलेल्या या रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. जलवाहिनी बदलण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी समांतरच्या ठेकेदारांनी देण्याचे मान्य केले आहे. विद्युत खांबही काढले जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.