गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला भाजपच्या शहर आणि जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा विषय अखेर मार्गी लागला असून भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार प्रकाश भारसाकळे यांची, तर शहर अध्यक्षपदी नगरसेवक तुषार भारतीय यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री त्यांच्या निवडीची घोषणा केली.
अमरावती जिल्ह्यातील भाजप आणि राजकीय वर्तुळात देखील भाजपच्या नव्या शिलेदारांच्या निवडीचा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेला आला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलले जाणार काय, हा सवाल होता. जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या काही जुन्या कार्यकर्त्यांना मागे टाकून दर्यापूरचे माजी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी बाजी मारली. शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस असा प्रवास करणाऱ्या प्रकाश भारसाकळे यांना थेट जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यास भाजपमधील एका गटाने विरोध दर्शवला होता. पण, प्रकाश भारसाकळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठलीही वादग्रस्त भूमिका न घेण्याची त्यांची कार्यशैली त्यांची जमेची बाजू ठरली आणि त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
प्रकाश भारसाकळे यांनी दर्यापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, नारायण राणे यांच्यासोबत सेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्येही सन्मानाचे स्थान न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला होता. विधान परिषदेत त्यांना संधी दिली जाईल, असे संकेत मिळाले होते. पण, भाजपमधून ऐनवेळी जमीन विकासक आणि शिक्षण संस्थाचालक प्रवीण पोटे यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी विजयही खेचून आणला. भारसाकळे यांना आता भाजपमध्ये नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
तुषार भारतीय हे अमरावती महापालिकेत भाजपचे प्रतिनिधित्व करीत असून शहर बससेवेत महिलांसाठी विशेष बसगाडय़ा सोडण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, अमरावतीत परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि भोजनाची सोय करून देण्याची त्यांनी केलेली धडपड त्यांच्या कामी आली. भारतीय यांना डॉ. प्रदीप शिंगोरे यांच्या जागी शहराध्यक्षपद देण्यात आले आहे.