नगरोत्थान योजनेतील ३ कोटी, तसेच रस्ते विकास अनुदानाचा एक कोटी निधी मिळूनही शहरातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे, असा सवाल करतानाच रस्ते दुरुस्तीसाठी बेफिकीर असणाऱ्या नगर परिषदेविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिला.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अंबेकर यांनी म्हटले आहे, की रस्त्यांच्या कामांसाठी नगरोत्थान योजनेच्या निधीत पालिकेने आपला निधी दिला नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी या कामास प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, त्यास १० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला. निधी असूनही नगर परिषदेच्या उदासीनतेमुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. स्थानिक आमदार व नगराध्यक्षा यांनी शहरातील १४ रस्त्यांचे डांबरीकरण सुरू करण्याबाबत अनेकदा तारखा जाहीर केल्या, तरी प्रत्यक्षात कामे सुरू झाली नाहीत. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जनतेचे हाल होत आहेत. सार्वजनिक दिबाबत्ती रस्ते, स्वच्छता आदींकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असून जनता मेटाकुटीस आली आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरातील नागरिकांकडून विविध करांपोटी ४ कोटी वसूल केले. मात्र, नागरी सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. यापुढे नेहमीप्रमाणे कारणे दाखविण्याऐवजी आठवडाभरात रस्त्यांचे डांबरीकरण सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अंबेकर यांनी दिला.