कुठे भावांचे देणारे हात पुढे येतात आणि जे दिले त्याच्या बदल्यात बहिणीच्या निव्र्याज प्रेमाची अपेक्षा करतात..तर कुठे मानलेल्या बहिणींचे प्रेम आपल्या मानलेल्या भावांना साद घालते..शहरात ठिकठिकाणी भाऊबीजेच्या निमित्ताने हेच चित्र दिसले, आणि भाऊबीज झाली आगळीवेगळी!  
 आम्ही आहोत तुमच्याबरोबर..!
सीमेवर लढणाऱ्यांच्या पत्नीच्या मनाचा खंबीरपणा काही औरच! याच खंबीरपणाला सलाम करून ‘आम्ही तुमच्याबरोबर आहोत’ अशी भावना व्यक्त केली ‘सैनिक मित्र परिवार’ आणि ‘कै.आत्माराम यशवंत म्हैसकर ट्रस्ट’ च्या कार्यकर्त्यांनी वानवडीतील वीरस्मृती वसाहतीत राहणाऱ्या १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत वीरमरण आलेल्या पंधरा जवानांच्या पत्नीबरोबर भाऊबीज साजरी केली. या वेळी या वीरपत्नीना प्रत्येकी एक हजार रुपये रोख प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.  
अग्निशमन दलाच्या जवानांनाही मिळाली घरची दिवाळी!
अग्निशमन दलाच्या जवानांची दिवाळी म्हणजे रोजच्या प्रमाणेच किंबहुना अधिकच सतर्क राहून आपले कर्तव्य करण्याची वेळ. या जवानांना आपले रक्षणकर्ते भाऊ मानून ‘कै. शंकरराव भोई प्रतिष्ठान’ च्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना ओवाळले आणि त्यांच्याबरोबर फराळही केला. या भाऊबीजेमुळे घरच्या दिवाळीच्या आनंदाची अनुभूती मिळाल्याची भावना या जवानांनी व्यक्त केली. अपर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रतिष्ठानच्या वतीने गेली पंधरा वर्षे हा उपक्रम राबविला
जातो.
शंभर वर्षांच्या आजोबांचीही भाऊबीज..
सुयोग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शंभराव्या वर्षांत प्रवेश केलेल्या आजोबांबरोबर भाऊबीजेचा आनंद साजरा केला आणि त्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या कडू-गोड घटनांबाबत त्यांच्याशी संवाद साधला. वयाच्या ९२ व्या वर्षी पर्वती सलग आठ वेळा चढून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळविलेल्या लक्ष्मण दिनकर यांनी शंभरीत पदार्पण केले आहे. २० जुलै १९३७ रोजी क्रांतिकारक वासुदेव गोगटे यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर हॉटसन याच्यावर फग्र्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गोळ्या झाडल्या होत्या. दिनकर हे या ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.
वंचित मुलांनी घेतला ‘सन ऑफ सरदार’चा आनंद..
‘मनजित सिंग विर्दी सामाजिक प्रतिष्ठान’ ने ही भाऊबीज अनाथ आणि बहुविकलांग मुलांबरोबर ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट बघण्याचा आनंद घेत साजरी केली. संतुलन संपर्क बालग्राम, मतिमंद सेवाधाम, निवासी शाळा भीमा कोरेगाव, जो-किड्स, कायाकल्प आणि इतर काही संस्थांमधील लहान मुले या उपक्रमात सहभागी झाली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निरीक्षण गृहातील बहिणींना मिळाले अनेक भाऊ,
तर देवदासी भगिनींना मिळाली माहेरची साडी!
आपल्या भाऊरायाची आतुरतेने वाट बघणाऱ्या, मुलींच्या निरीक्षण गृहातील अनेक बहिणींना ‘साईनाथ मंडळ ट्रस्ट’च्या कार्यकर्त्यांच्या रूपाने अनेक भाऊ मिळाले. या वेळी मंडळातर्फे मुलींना टिकल्यांची पाकिटे, कर्णफुले, नेल पॉलिश, बांगडय़ा, मेंदी अशा वस्तू, फटाके आणि फराळाचे पदार्थ देण्यात आले. तसेच ज्यांना घरची दिवाळी कधीच मिळत नाही अशा चोवीस देवदासी महिलांबरोबरही मंडळाने भाऊबीज साजरी केली. या वेळी या महिलांना साडी, बांगडय़ा आणि फराळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मंडळाचे कार्याध्यक्ष पीयूष शहा यांनी या
कार्यक्रमाचे संयोजन केले होते.