नवी मुंबईचे सांस्कृतिक व्यसपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृह डागडुजीकरिता दोन महिन्यांसाठी बंद ठेवले जाणार आहे.  हा काळ नोव्हेंबर-डिसेंबर असण्याची शक्यता आहे. नाटय़गृहाच्या वरचे सिमेंटचे छप्पर बदलण्याचे मोठे काम या काळात केले जाणार आहे. या नाटय़गृहात गेली पाच वर्षे बेकायदेशीर पाìकग केलेली मराठी बाणेदार बस हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सिडकोने १६ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असे बांधलेल्या नवी मुंबईतील किंबहुना राज्यातील एकमेव नाटय़गृहाची स्थिती आता केविलवाणी झालेली आहे.  ऐन संगीत कार्यक्रमाच्या वेळी पावसाच्या धारा रंगमंचावर कोसळल्याने या नाटय़गृहातील समस्यांची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. हे कमी म्हणून काय प्रेक्षकगृहातील प्रेक्षक थेट रंगमंचावर येऊन गोंधळ घालू लागले आहेत. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. नाटय़गृहातील तारखांचा घोळ तर नाटय़सृष्टीत चवीने चर्चिला जात आहे. नाटय़गृहात वेळोवेळी डास फवारणी होत नसल्याने प्रेक्षकांना आता सभागृहात बसणे मुश्कील झाले आहे. नाटय़गृहावरील छप्पर पूर्णपणे निकामी झाल्याने ते  बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पण मोठमोठी निविदा काढण्यात मग्न असणाऱ्या अभियंता विभागाला ही छोटी कामे काढण्यास  रस राहिलेला नाही. आवाजाच्या अनेक तक्रारी आहेत. मध्यंतरी नाटय़गृहातील घडय़ाळाने कायमचा श्वास घेतला होता. खासदार संजीव नाईक यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्यामुळे आता घडय़ाळ लागले आहे.   व्यवस्थापक म्हणून असणाऱ्या सी. डी. तायडे यांना भावे नाटय़गृह व्यवस्थापनाऐवजी उद्यान व्यवस्थापनामध्ये जादा ‘रस’ आहे. त्यामुळे नाटय़गृह कधी कधी रामभरोसे चालत असल्याचे दिसून येते. या जंजाळातून सोडवा, अशी मागणी उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. पण त्यांचीही सुटका होत नाही. तांत्रिक कामांची जबाबदारी अभियंता व विद्युत विभागाची असताना त्यांना सर्व बाजूने दोषी ठरविले जात आहे. त्यामुळे त्यांनी आयुक्तांकडे ही जबाबदारी दुसऱ्याला देण्याची अनेक वेळा मागणी केली, पण ती नाकारण्यात आली. गेली पाच वर्षे नाटय़गृहात ठाण मांडून बसलेली एक बस हलविण्याचा बाणेदारपणा मात्र त्यांनी या काळात दाखविला. १८ वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या भावे नाटय़गृहाची अनेक वेळा तात्पुरती दुरुस्ती झाली आहे. पण या नाटय़गृहाची चांगली डागडुजी करण्यासाठी दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय येत्या काळात प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.