बचत गटांच्या माध्यमातून जादा व्याज देण्याचे आमिष दाखवत चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेकांना कोटय़वधी रुपयांना फसविणाऱ्या तालुक्यातील बहाळ येथील भिकन महाराज यास पाचोरा न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि सहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.
बहाळ येथे बचत गटाची स्थापना करीत लाखो रुपयांच्या ठेवी जमा करणाऱ्या या भोंदू बाबास सात ऑगस्ट रोजी मेहुणबारे पोलिसांनी नंदुरबार येथे अटक केली होती. कमी कालावधीत जादा व्याज मिळत असल्याने परिसरातील अनेक जण महाराजाच्या आमिषाला बळी पडले. साई व समता या नावाने २० वर्षांपासून विविध प्रकारच्या दामदुपटीच्या योजनांमधून लोकांना आमिष दाखविले जात होते. याअंतर्गत ५०० रुपये प्रतिआठवडा पैसे भरल्यास ३० आठवडय़ानंतर १७ हजार ५०० रुपये परत दिले जात होते. १२० दिवसांच्या धुमधडाका योजनेंतर्गत एक हजार रुपये दररोज भरणाऱ्यास एक लाख ५० हजार रुपये तर, ९८ हजार रुपये भरणाऱ्याला ३२ हजार रुपयांप्रमाणे चार महिन्यात एक लाख २८ हजार रुपये मिळत होते. अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत गेल्याने लोकांचा या बाबावर विश्वास बसत गेला.
चाळीसगावातील दुर्गा प्रिंटिंग प्रेसमध्ये साई बचत गटाच्या पावत्या छापल्या गेल्याने प्रेसचे चालक चंद्रकांत चौधरी तसेच पाचोरा तालुक्यातील सुवर्ण व्यावसायिकांची फसवणूक झाली होती. पाचोऱ्यातील हनुमान संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भोई यांनी संस्थानचे एक लाख २५ हजार रुपये महाराजास दिले होते. त्यांना वेळेत व्याज मिळत नसल्याने मूळ रकमेची मागणी केली असता ती देण्यात आली नाही. महाराज फरार झाल्याचे कळल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यास अटक करून चौकशीदरम्यान त्याच्याकडून २० लाख ७४ हजार ४०६ रुपये रोख आणि पाच लाख ५० हजार रुपये किमतीच्या वस्तू जप्त केल्या. अटकेत असणाऱ्या भिकन महाराजला २० ऑगस्ट रोजी पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले. पाचोरा न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. मेहुणबारे येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यासह इतर १२ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. पाचोरा दिवाणी न्यायालयाचे न्या. रामचंद्र बागडे यांनी भिकन महाराजास शिक्षा सुनावली