यंदा जळगावसह राज्याच्या अनेक भागात कमी पर्जन्य झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने थेंब अन् थेंब पाण्याचे महत्त्व सर्वाना उमगू लागले आहे. जळगाव जिल्ह्यात तर केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दोन किंवा चार दिवसांआड पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा होत आहे. अशा स्थितीत पिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून त्यांना पुन्हा एकदा ठिबक सिंचन पद्धतीचा आधार घ्यावा लागणार आहे.
पाण्याचे दिवसेंदिवस कमी होणारे प्रमाण लक्षात घेऊन जळगावचे उद्योगपती भंवरलाल जैन यांनी जैन उद्योग समूह किंवा जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ही कंपनी सुरू केली. ठिबक सिंचन या पाणी व्यवस्थापनातील त्यांच्या क्रांतिकारक तंत्रश्वानाच्या प्रसारामुळे जळगावपासून ४० किलोमीटरवर असलेल्या वाकोद या छोटय़ाशा गावाचे नाव अल्पावधीतच जगाच्या नकाशावर झळकले. पिकांना किंवा फळझाडांना भरपूर पाण्याऐवजी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत तर होतेच शिवाय उत्पन्नातही वाढ होते, हे बुधवारी आपला अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भंवरलाल जैन यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.
पाणी व्यवस्थापनातील तंत्रज्ञान व कृषी क्षेत्रातील योगदानामुळे जैन यांना ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले आहे. दीपस्तंभ फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा. यजुर्वेन्द्र महाजन यांनी शून्यातून विश्व, उद्योजकता विकास, उद्योगातून सामाजिक बांधीलकी या संकल्पना वास्तवात आणणाऱ्या जैन यांनी जीवनातील अनेक चढ-उतार, अपयश यांचा सामना करत आज ठिबक सिंचन, सौर ऊर्जा प्रकल्प, खाद्य प्रक्रिया आदी उद्योगात यश मिळविल्याचे म्हटले आहे. संपूर्ण जगतात पाणी-व्यवस्थापनातील क्रांतिकारक तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे व महात्मा गांधींच्या ‘गांधी रिसर्च फाऊंडेशन’च्या उभारणीमुळे जैन यांचे नाव घेतले जात असल्याचेही प्रा. महाजन यांनी म्हटले आहे. तर, जैन पाईप, जैन ठिबक अशी ओळख असलेली कंपनी, टिश्युकल्चर, सौरऊर्जा यामध्येही कार्यरत असल्याचे आरती कुलकर्णी या म्हणतात.
जैन यांनी शेतकऱ्यांना नव्हे तर शेतीलाही श्वास दिला आहे. ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आली. कमी पाण्यात शेतकऱ्यांना अधिक क्षेत्राचे नियोजन करता येऊन शेती उत्पन्नातही वाढ झाली. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत तर ठिबक सिंचनचे महत्त्व अधिकच वाढले असल्याचेज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सदानंद गाडगीळ यांनी म्हटले आहे.