ऐरोली येथील मानव विकास फाऊंडेशन या संस्थेने एक किलोमीटरहून अधिक अंतरावरून चालत शाळेत जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा संकल्प सोडला असून गुरुवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या संस्थेने जव्हार तालुक्यातील डेंगाची मेट येथील श्रीजयश्वर विद्यामंदिराच्या ३५ विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप केले. संस्थेचे हे तिसरे वर्ष असून आतापर्यंत संस्थेने १२६ सायकली आदिवासी विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. यापूर्वी याच तालुक्यातील वाळवंडा येथील आदिवासी शाळेला सायकली देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय श्रीजयश्वर विद्यामंदिराच्या माध्यमिक विद्यार्थ्यांना लागणारे कंपास, पेन, हे शालेय साहित्य तसेच शाळेला एक संगणक, आठ सेलिंग फॅन देण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन या वस्तू दिल्या. त्याचप्रमाणे संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले. भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना दहा हजार सायकलींचे वाटप करण्याचा संस्थेचा मानस असून यात शहरातील विद्यार्थ्यांच्या नादुरुस्त सायकलींचा स्वीकार करून त्या दुरुस्त करून आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी ९३२३२४१९०० या क्रमांकावर संर्पक साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.