News Flash

‘अजाईल इंडिया’ ला मोठी आग; सव्वाकोटीचे नुकसान

औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसी परिसरातील सिंथेटिक रबर तयार करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत सुमारे सव्वाकोटीचे नुकसान झाले. करमाड पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात

| April 21, 2013 01:44 am

औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसी परिसरातील सिंथेटिक रबर तयार करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत सुमारे सव्वाकोटीचे नुकसान झाले. करमाड पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी आग पसरताच ज्वालाग्राही सिंथेटिक रबर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने प्रचंड नुकसान झाले. सुमारे चार तास केलेल्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.
शेंद्रा एमआयडीसीच्या सेक्टर डी ११६ भागात असलेल्या अजाईल इंडिया पॉलिमर प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीड-दोनच्या आसपास ही आग लागली. ज्वालाग्राही रबरमुळे आग लगेच पसरली. आग लागल्याचे तातडीने अग्निशामक दलास कळविण्यात आले. वाळूज एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसीसह काही खासगी टँकर घटनास्थळी आले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
वाहनांच्या टायरला लागणारे कच्चे रबर या कंपनीत तयार केले जाते. जवळपास ७० ते ८० टन असलेला हा माल आगीत जळून खाक झाला. सुमारे ७० लाखांचा हा माल होता. या शिवाय मशिनरी, अन्य साहित्यासह कंपनीचे सव्वाकोटीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. कंपनीचे तीन व दोन सुरक्षा कर्मचारी रात्रीच्या वेळी कंपनीच्या सुरक्षेस तैनात होते. रात्री दीडच्या सुमारास लागलेली आग पहाटे साडेचारच्या दरम्यान आटोक्यात आली. तोपर्यंत आगीत बरेच नुकसान झाले होते.  या कंपनीत तीन शिफ्टमध्ये कच्चे रबर तयार केले जाते. प्रत्येक शिफ्टला २० कामगार काम करतात. दररोज पाच-सहा टन माल कंपनीतून पुरवला जातो. शुक्रवारी औद्योगिक सुटीमुळे कंपनी बंद होती. त्यामुळेच जीवितहानी टळू शकली.
पाण्यासाठी धावाधाव!
या कंपनीला आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशामक दलास कळविण्यात आले. मात्र, तासाभराने पहिली गाडी घटनास्थळी आली. तोपर्यंत आगीने कंपनीला कवेत घेतले होते. आलेला टँकरही खूप लहान होता. त्यानंतर काही वेळाने अन्य गाडय़ा आल्या. मात्र, पाणीटंचाईमुळे या गाडय़ांनाही पाणी मिळविण्यात अडचण आली. किमान आगीसारख्या दुर्घटनेत दलाच्या गाडय़ा सज्ज असणे आवश्यक असताना प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळेच होते. पाण्यासाठी दलाच्या गाडय़ांनाच धावाधाव करावी लागत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:44 am

Web Title: big fire in ajail india more than one carod loss
टॅग : Fire,Mishap
Next Stories
1 ‘समांतर’ चे काम जीवन प्राधिकरणमार्फत करावे
2 पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी
3 गोदामे फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Just Now!
X