रडारड, आरडाओरड, आईचा पदर आणि बाबांची पँट घट्ट धरून ठेवणारी चिमुकली मिठी, जिवाच्या आकांताने वर्गाच्या उंबरठय़ाबाहेर पडण्याची धडपड हे दृश्य सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशी दिसते. परंतु हे दृष्य यंदा पूर्णपणे बदलणार आहे.
मुलांना शाळेविषयी प्रेम, ओढ, आवड निर्माण व्हावी म्हणून ढोल-ताशे, फुले, फुगे अशा उत्सवी वातावरणात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, या ‘शालेय शिक्षण विभागा’च्या आदेशांच्या आधीपासूनच मुंबईतील अनेक शाळा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे ‘ग्रॅण्ड’ स्वागत करून साजरा करत आल्या आहेत. पहिल्या दिवशी अभ्यासावर पूर्णपणे फुली मारत मस्ती, मजा, धम्माल असेच काहीसे वातावरण या शाळांमध्ये असते. काही शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गामध्ये मस्तीची ही पाठशाळा तर तब्बल आठवडाभर चालते. यंदाही या शाळा पहिला दिवस ‘जरा हटके’च साजरा करणार आहेत.
कागदाच्या होडय़ा, विमान आणि बरेच काही
गोरेगावच्या ‘वाल्मिकी इको स्कूल’मध्ये पहिल्या दिवशी आईबाबांनाही प्रवेश असतो. गाणी, खेळ, कागदाच्या होडय़ा बनवून पाण्यात सोडणे, कागदाच्याच विमान-छत्र्या बनवून शाळेत उडविणे, पावसात मनसोक्त भिजणे हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम. शाळेचा एक माजी विद्यार्थी मोहन विदूषकाचा वेष परिधान करून इथल्या रडवेल्या लहान मुलांना खुलविण्याचे काम करतो. मुलांनी शाळेत रमावे यासाठी आठवडाभर चिवडा, चिक्की, राजगिऱ्याचे लाडू अशी खाऊची ‘लालूच’ दाखविली जाते. पुढे आठवडाभर हेच वातावरण शाळेत असते.
मोठय़ा मुलांच्या बाबतीत थोडे वेगळे उपक्रम असतात. त्यात वर्गात गोल करून चेंडू एकमेकांकडे उडवायचा. ज्याच्या हातात चेंडू येईल त्याने आपली ओळख थोडक्यात करून द्यायची. त्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी कशी घालविली, कोणते नवीन शब्द शिकलो, पुस्तके वाचली याची माहिती सांगायची. वर्गात नव्याने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. उदाहरणार्थ यंदा प्रत्येक वर्गात ‘रीडिंग कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. त्याचा उपयोग कसा करायचा याची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना देऊ, असे शाळेच्या मुख्याध्यापिका निकीता पिंपळे यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्येक मुलांकडून एक सामूहिक व वैयक्तिक शपथ लिहून घेतली जाते. आम्ही आमचा वर्ग स्वच्छ ठेवू, गोष्टी सांगायला शिकेन, अक्षर सुधारेन, चांगले गुण मिळवेन या पद्धतीच्या शपथा विद्यार्थी घेतात.
झुकझुकगाडीतून शाळेची ओळख
बोरिवलीच्या ‘बीमानगर एज्युकेशन सोसायटी’च्या ‘बालमंदिर’मध्ये मुलांना नावीन्यपूर्ण पद्धतीने संपूर्ण शाळेची ओळख करून दिली जाते. पहिल्या दिवशी पालकांनाही शाळेत प्रवेश असतो. शाळेत फुगे, रांगोळी, कागदी पताका, रेड कार्पेट वगैरे अशी वातावरणनिर्मिती असते. मुला-पालकांचे लहान गट करून त्यांना शिक्षिका शाळेत फिरवून आणतात. मुला-पालकांची ही झुकझुकगाडी तळमजल्यावरून पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर फिरून परत वर्गात येते. शिशुवर्गात चांगला अभ्यास केला की तुम्ही पहिल्या मजल्यावरील पहिलीच्या वर्गात जाणार, त्यानंतर पुढे चांगला अभ्यास केला की दुसऱ्या मजल्यावरील दुसरीच्या वर्गात जाणार, असा गंमतीदार संवाद शिक्षक आणि मुलांमध्ये रंगतो. पुढे आठवडाभर खेळ, गाणी, नाच असेच धम्माल वातावरण शाळेत असते, असे शाळेच्या पद्मा कासार्ले यांनी सांगितले.
पपेट शो, नाटुकली, गाणी
वांद्रे पूर्व येथील ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’मध्ये गेली अनेक वर्षे एक ‘थीम’ घेऊन मुलांचे स्वागत केले जाते. १७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थेचा वर्धापनदिनही आहे. वृक्षारोपण करून हा दिवस साजरा केला जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेचे शिक्षक पपेट शोच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतील. पहिला दिवस सर्व वर्गामध्ये गोष्टी सांगून, गाणी गाऊन साजरा केला जातो. शिक्षक विद्यार्थ्यांकरिता रिडल गेमसारखे वेगवेगळे खेळ आयोजित करतात. यंदा आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले छोटे नाटुकलेही सादर केले जाणार आहे, असे शाळेचे एक शिक्षक रवींद्र कांबळी यांनी सांगितले.
मस्ती डे
संजना कपूर यांच्या ‘जुनून ग्रूप’तर्फे चालविल्या जाणाऱ्या कांदिवली चारकोप येथील ‘अक्षरा हायस्कूल’मध्ये पहिला दिवस म्हणजे संगीत, नाटक, गाणी, अभिनय, साहित्यावर आधारित कार्यक्रमांचा मस्ती डे. नाटय़कलेला वाहिलेल्या या शाळेचा पहिला दिवसही कलात्मकपणे साजरा केला जातो. पहिल्या दिवशी पपेट शो, गोष्टी, गंमत गाणी या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेविषयी ओळ निर्माण होईल असे कार्यक्रम आयोजिले जातात. मधल्या सुट्टीनंतर भारतीय आणि पाश्चात्य संगीतावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आयोजिला जातो, असे मुख्याध्यापिक सुधा मांजरेकर यांनी सांगितले.

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?