आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आमदार राजीव सातव यांचे नाव हिंगोलीतून पुढे येताच माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी या चर्चेचे खंडण करून आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले असतानाच आता अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करीत गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. गेल्या निवडणुकीत सेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला.
आता निवडणुका जवळ आल्या असता गेल्या सहा महिन्यांपासून या मतदारसंघातून कळमनुरीचे आमदार तथा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा आहे. राजीव सातव यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन याच्या बदल्यात इतर दुसरा मतदारसंघ राष्ट्रवादीला देणार असल्याची जोरदार चर्चा असताना सूर्यकांता पाटील यांनी चर्चेचे खंडण करून आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने हिंगोलीची जागा राष्ट्रवादी की काँग्रेसला यावर जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
या सर्व प्रकरणात दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे मूळ वसतम येथील माजी आमदार मुंजाजीराव जाधव यांचे पुत्र अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी तर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याची पूर्व तयारी सुरू केली.  ८ दिवसांपूर्वी त्यांनी वसमत जवळा बाजार याठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत पत्रकार परिषद घेऊन हिंगोली लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. गतवर्षीच्या मुंजाजी जाधवांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात गृहमंत्री आबा यांच्या भाषणातून हिंगोलीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी जाधवच असल्याचे जणू संकेत होते. दरम्यान पुढील निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव की राष्ट्रवादीकडून श्रीमती पाटील, अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यापैकी कोण? याविषयी आताच उलटसुलट चर्चा आहे.