निवासी डॉक्टरला पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडून पडली आहे. नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा फटका सामान्य गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना बसत असल्याने मार्डने संप तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे, तर जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर डॉक्टर संरक्षण कायद्याखाली कारवाई होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचे हेकेखोर धोरण मार्डने अवलंबविले आहे.
मार्डच्या या संपामुळे सामान्य रुग्ण व नागरिकांत सहानुभूतीऐवजी संतापाची भावना पसरल्याचे दिसून येते. त्यामुळे एरव्ही पोलीस ठाण्यात दाद मागण्यासाठी येणाऱ्या पीडित अन्यायग्रस्त नागरिकांच्या प्रति संवेदनशीलता हरपलेल्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा उजळ होत असल्याचे या घटनेच्या निमित्ताने दिसून येते. पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांनी मारहाण केलेल्या निवासी डॉक्टर प्रशांत पाटील यांनी स्वत: आपल्यातील संवेदनशीलता दाखवून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला मदत केली असती तर हा प्रकारच घडला नसता. परंतु त्यांनी सर्वस्वी नकारात्मक भूमिका घेऊन आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिल्यानेच त्याबद्दलचा रोष सार्वत्रिक स्वरूपात प्रकट झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या प्रश्नावर मार्डने पुकारलेल्या संपामुळे रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे. १४० निवासी डॉक्टर संपावर असून त्यामुळे नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एरव्ही रुग्णालयात दररोज १५ मोठय़ा शस्त्रक्रिया होतात. तर छोटय़ा शस्त्रक्रिया ३०पर्यंत होतात. परंतु संपामुळे मोठय़ा शस्त्रक्रिया केवळ दोन झाल्या. तर छोटय़ा शस्त्रक्रियांची संख्याही २३पर्यंत घटल्या. दररोज रुग्णालयातील बाहय़ उपचार विभागात १६००पेक्षा अधिक रुग्ण येतात. तर आंतररुग्ण विभागात १५०पेक्षा जास्त रुग्ण दाखल होतात. परंतु पर्यायी व्यवस्था केली तरी संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी सांगितले. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षकांची सुमारे ५०पदे रिक्त आहेत. चतुर्थश्रेणी सेवकांचीही वानवा आहे. यंत्रसामग्री, औषधांची कमतरता आहे. अशा अडचणींचा पाढा अधिष्ठाता डॉ. शिंदे यांनी वाचून दाखविला.