‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या निमित्ताने विदर्भात मोठी औद्योगिक गुंतवणूक अपेक्षित असून ‘सातत्य’ राहिले तरच हे शक्य आहे, असे स्पष्ट मत पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला आज सदिच्छा भेट दिल्यानंतर संपादकीय विभागाशी चर्चा करताना मोघे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विदर्भाशी संबंधित अनेक प्रश्नांवर मनमोकळी मते मांडली.
विदर्भातील अनेक प्रकल्प वन कायद्यांमुळे रखडले आहेत. सिंचन प्रकल्पांमध्ये क्षमता असूनही पाणी शेतक ऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. रोजगार क्षमता असूनही प्रकल्पांना विरोध होत असल्याने वातावरणाबाबत उद्योग जगत साशंक असते. अशाही परिस्थितीत विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही गुंतवणूक परिषद मैलाचा दगड ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
औद्योगिक परिषदेत देशभरातील नामवंत उद्योगपती निश्चितपणे सहभागी होतील आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार होईल, असा विश्वास व्यक्त करून पर्यटन क्षेत्र सगळ्यात मोठे आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात समृद्ध वनसंपत्ती आहे. त्यामुळे पर्यटनाला मोठा वाव राहील. परंतु, त्या दिशेने पावले टाकण्यात आली तर इको-टुरिझमचा एक पट्टा तयार होऊन हजारो हातांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. त्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्टना जंगलांच्या जवळपास परवानगी मिळाली, तर बरेच अडथळे दूर होतील.
आम्हाला कोणत्या स्थानिकांना त्यासाठी जंगलाबाहेर काढायचे नाही. प्रत्येक योजनेचे फायदे-तोटे दोन्ही असतात. ताडोबात देशाचा सर्वात मोठा ‘टायगर हब’ आहे. परंतु, त्याचा प्रसार करण्यात आपण कमी पडलो आहोत. अत्यंत आकर्षक अशी प्राचीन मंदिरे, पर्यटन स्थळेही विदर्भात आहेत.
इको-टुरिझमच्या दृष्टीने हा प्रदेश समृद्ध क्षेत्र आहे. या परिषदेत प्रामुख्याने पर्यटनातील गुंतवणुकीवर भर देण्याचा प्रयत्न राहील, असेही मोघे यांनी सांगितले.
विदर्भात खनिज भरपूर प्रमाणात आहे. विशेषत: मँगनीजचे खाण उद्योजकांना मोठे आकर्षण आहे. या भागापासून मध्य प्रदेश-छत्तीसगड जवळ आहे.
वीज, पाणी भरपूर प्रमाणात आहे. उद्योगांना स्वस्तात वीज देण्याच्या प्रस्तावावरही विचार सुरू आहे.
ऑटोमोबाईल हब झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या आणखी २०० उद्योगांना रोजगार मिळू शकतो. आजच्या घटकेला लाखो सुशिक्षित तरुण-तरुणी नोक ऱ्यांच्या शोधात आहे. त्यांना विदर्भातच रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योग येत असतील तर विरोध नको.
प्रकल्पांना विरोध ही प्रवृत्ती आता बदलण्याची वेळ आली आहे. विकास पाहिजे असेल तर उद्योग येऊ द्या, शहराचा चेहेरामोहरा बदलेल, असेही मोघे यांनी स्पष्ट केले.
अॅडव्हांटेजच्या मार्गातील राजकीय मतभेदांचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. आज अंतिम हात फिरविला जात असून पहिले लक्ष्य उद्योगपतींच्या सहभागावर केंद्रित करण्यात आले आहे.
खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यासाठी प्रयत्नरत आहेत. याला राजकीय वळण देण्याचा अट्टहास काहींनी केला. खरेतर हे एक सर्वपक्षीय आयोजन आहे आणि सर्वाचे सहकार्य त्याला अपेक्षित आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांप्रमाणे येथील नेत्यांनी मनात आणले तर क्रांती घडू शकते, असा आशावाद पालकमंत्र्यांनी मांडला.