घरगुती वापराच्या द्रवरूप गॅस पुनर्भरणाचे (रिफीलींग) मोठे रॅकेट जिल्ह्य़ात कार्यरत असून नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे अलिकडेच झालेला घरगुती गॅसच्या टाकीचा स्फोट हा या गोरखधंद्यातीलच प्रकार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. या गावात हा उद्योग सर्रास सुरू असून हा स्फोट लक्षात घेता हे गावच त्यामुळे ‘गॅस’वर आहे, भविष्यात मोठी दुर्घटना झाली तर गावालाच धोका निर्माण होऊ शकतो.
बॉटलिंगच्या ठिकाणी जाणारे घरगुती द्रवरूप गॅसच्या टँकरमधून रात्री, अपरात्री हा गॅस काढून घेतला जातो. तो घरगुती टाक्यांमध्ये भरून या टाक्या काळ्या बाजारात विकल्या जातात. वरकरणी हा साधा प्रकार असला तरी प्रत्यक्षात तो अत्यंत धोकादायक असून पैशांच्या लालसेपोटी दुर्घटनेलाच आमंत्रण देण्याचा हा प्रकार आहे. नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे मागच्या आठवडय़ात आशाच एका टँकरमधून हा गॅस काढून घेताना त्याचा स्फोट झाल्याचे समजते. त्यात दोघे जखमी झाले असून जेथे हा प्रकार चालतो तेथूनच जवळ असलेल्या घराचेही या स्फोटाने मोठे नुकसान झाले. यातील काही जखमी नगर येथे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेनंतर ‘घरगुती गॅसचा स्फोट’ अशी साधी नोंद करून पोलीस ‘निश्चिंत’ आहेत.  
घरगुती द्रवरूप गॅसची वाहतूक करणारे टँकर शिंगवे तुकाई गावातील ओढय़ात नेले जातात. चालकांच्या संगनमतानेच हे प्रकार होतात. ओढय़ात हे टँकर लावून त्यातून द्रवरूप गॅस काढला जोता, तो घरगुती रिकाम्या टाक्यामंध्ये भरून त्या काळ्याबाजारात विकल्या जातात. स्फोटाची घटना घडली त्यावेळी हाच उद्योग सुरू होता. टँकरमधून हा अत्यंत ज्वलनशील द्रवरूप गॅस काढतानाच त्याचा स्फोट झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. या गोरख धंद्याचे मोठे रॅकेटच कार्यरत असून संबंधीत सर्वाच्या संगनमताने हा उद्योग चालतो. घरगुती गॅससह वाहनचालकांना या गॅसचे चढय़ा भावाने पुरवठा केला जातो. जवळच्याच धाबाचालकाचा यात सहभाग असून दहशतीमुळे ग्रामस्थ यावर बोलत नाहीत अशी माहिती मिळाली.
हरियाणा, गुजरातमधून द्रवरूप गॅस विशिष्ठ टँकरद्वारे महाराष्ट्रात येतो. या टँकरला या व्यवसायाच्या परिभाषेत बॉटल म्हणतात. एका टँकरमध्ये घरगुती वापराच्या साधारणपणे १ हजार ३०० ते १ हजार ४०० टाक्या भरतात. सोलापूर, तळेगाव आदी ठिकाणी रिफीलींग होते. मात्र या रिफीलींग प्रकल्पात येण्याआधीच त्यातील काही गॅस वरील पध्दतीने काढून घेऊन त्या टाक्यांचा काळाबाजारात वापर केला जोतो. शिंगवे तुकाई येथे त्या दिवशी अशा पध्दतीने ३० टाक्यांचा गॅस काढण्यात येत होता, त्यातच स्फोट झाला. त्यानंतर आधी भरलेल्या टाक्या येथून हलवल्याचे समजते. सध्याच्या बाजारभावाने तीस ते चाळीस टाक्या म्हणजे एका खेपेला तीस ते चाळीस हजार रूपयांचा गफला केला जातो.
या आर्थिक गफल्यापेक्षा इतरांच्या जीवाशी खेळण्याचाच हा उद्योग असून शिंगवे तुकाई येथील ताजा स्फोट त्याचेच उदाहरण आहे. येथे स्फोट झाला त्यावेळी त्या टँकरमधून तीस घरगुती टाक्या भरून घेण्यात आल्या होत्या. त्यातील एका टाकीचा स्फोट झाला तर काही माणसे जखमी झाली, शिवाय जवळच्या घराचे मोठे नुकसान झाले. या टँकरमध्ये १ हजार ३०० टाक्या भरता येतील एवढा द्रवरूप गॅस असतो. त्याचा गांभीर्याने विचार केला तर संभाव्या धोक्याची जाणीव होते. भविष्यात काही दुर्घटना घडली तर पुर्ण गावालाच त्यातून धोका होऊ शकतो, मात्र संबंधीत यंत्रणांचेही त्यात आर्थिक हितसंबंध गुंतल्याचे बोलले जाते. त्यामुळेच गावाला ‘गॅस’वर बसवून हा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे.