नवीन वर्षांचे स्वागत सारेजण आपापल्या पद्धतीने करत असताना दैनंदिन जीवनात संवेदनशीलता लोप पावत असल्याचे दिसत आहे. आपल्या परिघापुरता विचार करण्याची वृत्ती आपल्याला ऐनवेळी कधी कोणाची गरज भासू शकते याचा विचार न करणारी आहे. नववर्षांच्या जल्लोषाआधी धूम स्टाईलने दुचाकी दामटणाऱ्याने एसटी बसला थांबवत चालकाला प्रवाशांदेखत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी बसमधील एकाही प्रवाशाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. जो चालक आपल्याला घेऊन मार्गस्थ होत आहे, त्याबाबत प्रवाशांनी दाखविलेला असंवेदनपणा नव्या वर्षांत पाऊल ठेवताना विचार करायला लावणारा आहे.
नववर्षांच्या सुरुवातीला टोळक्यांचा धांगडधिंगा काही नवीन नाही. एरवी शहरातील अनेक रस्त्यांवर महाविद्यालयीन युवक दुचाकींवर ‘स्टंटबाजी’ करताना दृष्टिपथास पडतात. त्यांच्या करामतींचा अन्य वाहनधारक व पादचाऱ्यांनाही त्रास होत असतो. हा नित्याचा अनुभव असताना स्टंटबाजी करणाऱ्या वाहनधारकांनी आता जाब विचारणाऱ्यांना थेट मारहाण करण्यापर्यंत मजल गाठली आहे. शहर वाहतुकीची बस भगूरहून सातपूरला निघाली असताना हा प्रकार घडला.
नाशिकरोडमार्गे बस द्वारका सर्कल परिसरात आली. मुळात या परिसरात वाहतूक कोंडी असल्याने बस संथपणे चालली होती. या वेळी धूम स्टाईल दुचाकीस्वार पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. अन्य वाहनांमधून मार्ग काढताना त्याला बसचा धक्का लागला. मग संबंधिताने थेट आपली दुचाकी पुढे नेऊन बससमोर आडवी घातली. चालक शिवाजी प्रभू मगर यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली. शर्टची कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अवघ्या काही मिनिटांत हा प्रकार घडला. बसमधील सर्व प्रवासी डोळ्यांदेखत हा प्रकार पाहत होते, परंतु एकानेही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. चालकाला मारहाण करून दुचाकीस्वार निघून गेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्र्यंबक रोडवर एसटी बसमध्ये एका टोळक्याने असाच धुडगूस घातला होता. तेव्हादेखील प्रवाशांनी असंवेदनशीलतेचे दर्शन घडविले होते. या वेळी त्याची पुनरावृत्ती झाली. मुंबईत एका महिला वाहकाला याच पद्धतीने बेदम मारहाण झाली होती, पण एकाही प्रवाशाने तिच्या मदतीला धावून जाणे आवश्यक मानले नाही.
आपल्यापुरता विचार करण्याची वृत्ती भविष्यात आपल्यालाही संकटात टाकणारी आहे याचा विचार केला जात नाही. रस्त्यावर अपघात झाला, कोणी जखमी पडलेले दिसले तरी नको ती झंझट म्हणून पुढे जाणारे अनेक जण असतात. तथापि, कधीतरी ही वेळ आपल्यावर येऊ शकते याचा विचार होत नसल्याचे दिसत आहे.