वीज वितरण कंपनीच्या कारभाराची अनुभूती ग्राहक वेगवेगळ्या माध्यमातून घेत असतानाच आता जे या कंपनीचे ग्राहक होण्यास इच्छुक आहेत, त्यांना वीज पुरवठा न करताच बील पाठविण्याची अचाट कामगिरी कंपनीने केली आहे. ग्राहक होण्यापूर्वीच झटका देत वीज कंपनीने संबंधिताची थट्टा केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार करत संबंधिताने पोलिसांकडे दाद मागितली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन झाल्यानंतर वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीकडून वीजबिलांची काटेकोरपणे वसुली करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तथापि, ग्राहकांना वीज बिले देताना त्यात अनेक घोळ होत असल्याचे अधुनमधून निदर्शनास येत असते. मीटरच्या रिडिंगचा आधार न घेता ग्राहकांना वाढीव बिले देण्याचेही प्रकार घडले आहेत. ज्या ग्राहकांना असे बील येते, त्यांना मग ते दुरूस्त करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात खेटा माराव्या लागतात. म्हणजे, चूक वीज कंपनीची, परंतु, त्याचा भरुदड ग्राहकांना सोसावा लागतो.
एखाद्या ग्राहकाचे केवळ एका महिन्याचे बील थकले तरी बील भरण्याच्या मुदतीनंतर लगेचच कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू होते. या परिस्थितीत कंपनीच्या कारभाराचा आणखी एक वेगळा नमुना पुढे आला आहे. घोटी शहरातील शनी मंदिराजवळ छोटासा व्यवसाय करणारे प्रकाश संचेती यांनी घरी वीज मीटर मिळावे म्हणून अर्ज करून साडे चार हजार रूपये भरले होते.
मागणी व अर्ज भरल्यानंतर त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात अनेक हेलपाटे मारले. त्यानंतर कंपनीने वीज मीटर दिले, परंतु, वीज पुरवठा आजतागायत सुरू केलेला नाही. दरम्यानच्या काळात संचेती यांचे खेटे मारण्याचे काम सुरू होते. सहा महिन्यानंतर एक दिवस अचानक वीज कंपनीने त्यांना ०९००६७५९७७ या मीटर क्रमांकाचे ५५ युनिट वापराचे २८० रूपयांचे बील पाठविले.
विजेचे बील पाहून संचेती गोंधळून गेले. वीज कंपनीने वीज पुरवठा सुरू न करता बील पाठवून आपली फसवणूक केली.
या कारणावरून त्यांनी अखेर पोलिसांकडे दाद मागितली आहे. या बाबतचा तक्रार अर्ज त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिला आहे.