लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षण करण्यासाठी संगणकीकृत आरक्षण केंद्रांमधील दलालांना रोखण्यासाठी आता बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या आरक्षण केंद्रांवर डिसेंबरअखेपर्यंत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
बनावट नावाने लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकीटांचे आरक्षण करून त्यांचा नंतर काळाबाजार करणाऱ्यांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन वारंवार वेगवेगळे सुरक्षिततेचे उपाय शोधत आहे. मात्र त्यानंतरही अशा लोकांना शोधणे कठीण होत असल्याची कबुली रेल्वे सूत्रांनी दिली आहे. ही यंत्रणा यापूर्वी प्रायोगिक तत्वावर रेल्वेच्या दोन विभागात बसविण्यात आली आहे. तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या अंगठय़ाचा ठसा आरक्षणासाठी आल्यावर घेण्यात येईल. हा ठसा घेतल्यावर संबंधित व्यक्ती त्या किंवा अन्य कोणत्याही आरक्षण केंद्रातून त्याच दिवशी पुन्हा आरक्षण करण्यासाठी येऊ शकणार नाही. ही यंत्रणा डिसेंबरपूर्वी मुंबईतील मोठय़ा आरक्षण केंद्रांवर बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र आरक्षण खिडकीवर असलेला कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तपासतील.
यापूर्वी दलालांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जुलै २०११ पासून तात्काळ तिकीट काढण्याची वेळ सकाळी आठ ऐवजी १० केली होती. अनेकदा तात्काळची तिकीटे काढण्यासाठी दलाल मंडळी रात्रीच तात्काळ केंद्रांबाहेर रांगा लावून झोपत असत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तात्काळची तिकीटे मिळणेही दुरापास्त झाले होते. आता ही वेळ सकाळी १० वाजता करण्यात आल्याने रात्रभर रांग लावण्याची आवश्यकता नसून दलालांना येथूनही काढता पाय घ्यावा लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरक्षण केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रवाशाला टोकन देण्याची पद्धतही सुरू करण्यात आली असली तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही, असे सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने आरक्षण केंद्रांमध्ये वावर असलेल्या दलालांना रोखण्यासाठी प्रवाशांवरच वेगवेगळे प्रयोग सुरू केल आहेत. तसेच रेल्वेचे काही कर्मचारीही तिकीटांचा काळाबाजार करण्यात गुंतल्याचे आढळून आले आहे. विशेष गाडय़ांचे आरक्षण करण्यामध्ये हे कर्मचारी प्रामुख्याने पुढे असतात. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने केलेल्या कारवाईत पुणे विभागातील एका तिकीट आरक्षण कर्मचाऱ्यास अटकही करण्यात आली आहे. त्याला निलंबित  करण्यात आले आहे. विशेष गाडय़ांचे आरक्षण आता स्वतंत्र न करता नियमित गाडय़ांच्या प्रतीक्षायादीवर असणाऱ्यांना प्राधान्य, तात्काळमध्ये तिकीट घेणाऱ्यांच्या मनगटावर सुरक्षा रक्षकांकडून विशेष पट्टा बांधणे आदी उपायही करण्यात येत आहेत. पुण्याहून छट पूजेसाठी सोडण्यात आलेल्या विशेष गाडय़ांच्या आरक्षणासाठी या उपायांचा वापर करण्यात आला असून त्यामुळे प्रवाशांना विशेष गाडी पकडणे सोयीचे झाल्याचे सांगण्यात येते.