मुंबईतील हजारो लोकांची पावले शनिवारी शिवडी भागाकडे वळली होती. यात कारने जाणारे उच्चभ्रू लोक होते, तसेच हार्बर लाइनवर लोकलने प्रवास करून आलेले सामान्यही. साऱ्यांची दिशा एकच होती शिवडीची खाडी आणि उद्देशही एकच होता फ्लेमिंगोदर्शन.
शिवडी खाडीमध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या काळात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात. या पक्ष्यांचे पक्षीप्रेमींसह सर्वसामान्य लोकांनाही निरीक्षण करता यावे, त्यांच्याबद्दल माहिती मिळावी आणि दूरदेशाहून आलेल्या या ‘पाहुण्यांबद्दल’ आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तर्फे फ्लेमिंगो महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाला यंदाही मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.या दिवसानिमित्त ‘बीएनएचस’ने शिवडी खाडी येथे दुपारी १२पासून सूर्यास्तापर्यंत नागरिकांसाठी फ्लेमिंगो पक्ष्यांच्या निरीक्षणाची सोय केली होती. त्यासाठी शिवडी रेल्वे स्थानकावरून खाडीपर्यंत बसची व्यवस्थाही करण्यात आली होती. दिवसभरात हजारो लोक फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी सहकुटुंब शिवडीला आले. नजर जाईल तेथे पांढरेशुभ्र फ्लेमिंगो पाहून साऱ्यांचे डोळे तृप्त होत होते. हे पक्षी आणखी जवळून पाहता यावेत यासाठी ‘बीएनएचएस’च्या स्वयंसेवकांनी लोकांना दुर्बिणीतून पक्षी पाहण्याची सोय करून दिली होती. या डौलदार पक्ष्याचे असे जवळून दर्शन होताच अनेकांच्या तोंडून आनंदाचे चीत्कार निघत होते.
दर वर्षी उन्हाळ्यात गुजरातमधील कच्छची खाडी सुकते. त्यामुळे खाद्य मिळत नसल्याने तेथील फ्लेमिंगो पक्षी मुंबईकडे येतात. त्यांचा मुक्काम प्रामुख्याने शिवडी खाडीत असतो. मात्र येथील भरती-ओहोटीनुसार ते इतर खाडय़ांमध्ये जा-ये करतात. या वर्षी सुमारे १५ हजार फ्लेमिंगो आले असून, त्यात ‘लेसर फ्लेमिंगो’ आणि ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ या दोन्ही प्रजातींचा समावेश आहे. डिसेंबर ते जून या काळात हे पक्षी मुंबईत असतात आणि नंतर कच्छला परत जातात, अशी माहिती बीएनएचएसचे अतुल साठे यांनी दिली.