हवामानातील बदलानुसार स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची संख्या जगात सुमारे ४० टक्के आहे. याच स्थलांतरणातून पर्यावरणाच्या संतुलनाची दिशासुद्धा कळते. मात्र, हेच स्थलांतरण पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे गेल्या काही वषार्ंत निदर्शनास आले आहे. विशेषत: पाणवठय़ांवर या स्थलांतरित पक्ष्यांची शिकार मोठय़ा संख्येने होत आहे. पक्ष्यांच्या स्थलांतरणादरम्यान पूर्वी खबरखिंडीतच पक्ष्यांच्या शिकारी होत, पण आता सर्वत्र हे प्रकार सुरू झाल्याने स्थलांतरित पक्ष्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन ही पक्षी अभ्यासकांसाठी मोठी संधी असली तरीही त्यांची शिकार ही सुद्धा मोठी समस्या आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन प्रामुख्याने पाणवठय़ावरच मोठय़ा प्रमाणावर होते. पाणवठय़ांमधील मासे आणि कीटकांवर हे स्थलांतरित पक्षी जगत असल्याने याच मास्यांना सावज बनवून पक्ष्यांची शिकार केली जात आहे. पाण्यात विषारी द्रव्य मिसळवणे, युरिया टाकणे यासारखे प्रकार घडत आहे. युरियामुळे पाण्यातील लहान माश्यांना गुंगी चढून ते पाण्यावर येतात आणि त्यांना खाण्यासाठी हे स्थलांतरित पक्षी आले की त्याची शिकार केली जाते. विणीच्या काळासोबत खाद्यान्नाच्या शोधात पक्ष्यांचे स्थलांतर होते. मात्र, या स्थलांतरित पक्ष्यांचे खाद्य असलेले छोटे कीटक, लहान मासे, बेडूक दूषित पाणी आणि हवेमुळे नष्ट होत आहेत. दूषित पाण्यातील खाद्य खाण्यात आल्याने पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवरसुद्धा परिणाम होत आहे.
चंद्रपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यात तलावांची संख्या अधिक आहे. तसेच अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्यातसुद्धा तलावांची संख्या बऱ्यापैकी असून येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही वर्षांत मात्र या तलावांचे अस्तित्त्वच धोक्यात आल्याने स्थलांतरित पक्ष्यांनीही पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. तलावांची दुरावस्था आणि शिकार या दोन्ही गोष्टी स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवावर बेतणाऱ्या आहेत. जागतिक हवामान बदलाचा अभ्यास, पक्ष्यांमधील संसर्गजन्य रोग आणि जंगल संवर्धन योजनांसाठी पक्ष्यांचे स्थलांतरण महत्त्वाचे आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्टय़ा त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत कुणी केला नाही. स्थलांतरित पक्ष्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली जात नाही. केंद्र किंवा राज्य सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळेही विदेशी पक्ष्यांच्या शिकारीचा धोका वाढत चालला आहे. तरीही यावर्षी राज्यसरकारने त्यादृष्टीने उचललेले पाऊल सकारात्मक या प्रकारात मोडणारे आहे. राज्याच्या वनखात्याने यावर्षी प्रथमच पाणवठय़ावरील पक्षीगणना आयोजित केली. नागपूर विभागात आयोजित या पक्षीगणनेत अनेक दुर्मीळ आणि संख्या रोडावलेल्या स्थलांतरित पक्ष्यांनी दर्शन दिले. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या शिकारीवर चाप बसेल, अशी अपेक्षा पक्षीअभ्यासकांनी व्यक्त केली आहे.