बेफाम नागरीकरणाच्या रेटय़ामुळे एकेक करून निसर्गरम्य ठिकाणे नाहीशी होत असलेल्या डोंबिवली परिसरातील भोपर गावाने मात्र तळे आणि त्यालगतची हिरवाई कसोशीने जपली आहे. त्यामुळे सकाळी उठून लोकल पकडण्याची घाई नसणाऱ्या डोंबिवलीकरांना ‘मॉर्निग वॉक’ करण्यासाठी एक जागा राखली गेली आहे. आता नोव्हेंबरच्या उत्तरार्धात पहाटे गुलाबी थंडी पडू लागल्याने अनेक डोंबिवलीकरांची पावले भोपरच्या दिशेने वळू लागली आहेत. रम्य तळे, त्याकाठचे मंदिर, वृक्षवेली असे आता केवळ ललित निबंधातून दिसणारे शब्दचित्र येथे अद्याप अस्तित्वात असून अनेक जातीच्या पक्ष्यांनाही या जागेचा शोध लागला आहे. थंडीच्या दिवसांत येथे सकाळी निरनिराळे पक्षी आढळून येतात. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करण्यासाठी हौशी छायाचित्रकार, निसर्गप्रेमी तसेच पक्षितज्ज्ञही आवर्जून भोपर गावास भेट देऊ लागले आहेत.
डोंबिवलीपासून सात किलोमीटर अंतरावरील भोपर हे कल्याण तालुक्यातील गाव. पूर्वी हे गाव कल्याण-डोंबिवली महापालिकेत होते. पुढे परिसरातील इतर २६ गावांप्रमाणे या गावानेही महापालिका प्रशासन नाकारले. त्यामुळे ही सर्व गावे महापालिकेतून वगळण्यात आली. महापालिकेतून वेगळे होऊनही त्यापैकी बहुतेक गावांना शहरीकरण थोपविता आले नाही. परिणामी, वाढत्या काँक्रीटीकरणाने शहरालगची ही गावे आता आपला चेहरा हरवून बसली आहेत. भोपर मात्र काही प्रमाणात त्यास अपवाद ठरले आहे. गावकऱ्यांनी तळे, छोटी टेकडी आणि हिरवाई हे निसर्गधन जपले आहे. त्यामुळे एक अतिशय छोटे का होईना पक्षी अभयारण्य तयार झाले आहे. पूवी निसर्गप्रेमी याच परिसरातील निळजे गावात पक्षी निरीक्षणाठी जात. आता त्याचबरोबरीने खिडकाळीजवळील पडले गावातही पक्ष्यांचे हिवाळी अधिवेशन भरू लागले असल्याची माहिती हौशी वन्यजीव छायाचित्रकार राजन जोशी यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली. भोपरच्या या अभयारण्यात तीन-चार प्रकारचे किंग फिशर, टिटवी पार्श, लिटिल कॉर्गोरांत, ड्रॅन्गो, ओपेन्विल स्टॉर्क, वुलीनेक स्टॉर्क, हुप्पू आदी अनेक देशी-विदेशी पक्षी आढळून येतात.