भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती उत्सवास सोलापुरात मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला. यंदा ३२१ सार्वजनिक मंडळांमार्फत डॉ.आंबेडकर प्रतिमा व मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने शहर व परिसरात आंबेडकरमय वातावरण दिसून येते. आठवडाभराच्या या उत्सवानंतर पुढील रविवारी, २१ एप्रिल रोजी जयंतीचा समारोप मिरवणुकीद्वारे होणार आहे.
मुंबई, नागपूर, औरंगाबादपेक्षा सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती अधिक उत्सावाने साजरी करण्याची परंपरा आहे. डॉ. आंबेडकर हे हयात असतानादेखील त्यांची जयंती सोलापूरच्या स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने साजरी केली होती. गेल्या दीड महिन्यापासून जयंतीची तयारी केली जात होती. त्यासाठी सार्वजनिक रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात डिजिटल फलकांच्या गर्दीला सुरुवात झाली होती.
शहरातील पांजरापोळ चौक, पार्क चौक, कुमठा नाका, विजापूर नाका झोपडपट्टी, बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ, दयानंद महाविद्यालय परिसर, देगाव रोड, फॉरेस्ट परिसर आदी आंबेडकरी समाजाचे प्राबल्य असलेल्या सर्व भागांमध्ये जयंतीच्या निमित्ताने आंबेडकरमय वातावरण निर्माण झाले आहे. किंबहुना त्या भागात दिवाळीसारखे आनंदी वातावरण पाहावयास मिळत आहे. पार्क चौकातील डॉ. आंबेडकर पुतळयाभोवती महापालिकेच्या वतीने भव्य शामियाना उभारण्यात आला असून तेथील वातावरण प्रेरणादायी ठरले आहे. तेथे रात्री बाराच्या ठोक्याला हजारो आंबेडकरी जनतेने येऊन डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. दिवसभर त्याठिकाणी हजारो आबालवृध्द नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. महापौर अलका राठोड यांनी तमाम सोलापूरकरांच्या वतीने सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, उपमहापौर हारून सय्यद, पालिका स्थायी समितीचे सभापती इब्राहीम कुरेशी आदींनी पार्क चौकात येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दिवसभर या परिसरात अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. तेथील वाहतूक अन्य रस्त्यावरून वळविण्यात आली होती.
यंदा जयंतीच्यानिमित्ताने प्रमुख रस्ते व चौकांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून डिजिटल फलकांनी केलेली गर्दी हा वादाचा विषय ठरला असला तरी जयंतीला विधायक स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या काही मंडळांनी बौध्दिक व्याख्यानमालांचे आयोजन केले आहे. तर काही मंडळांनी डिजिटल फलकांना फाटा देऊन तोच खर्च पाणी पुरवठय़ासाठी करण्याचा उपक्रम अमलात आणला आहे.
अखंड अभ्यासाद्वारे अभिवादन
ड्रीम फौंडेशनसारख्या सामाजिक व सेवाभावी संस्थेने डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून अखंड १२ तासांपासून ते १८ तासांपर्यंत अभ्यास करून महापुरुषाला अभिवादन करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. जुळे सोलापुरातील सोनिया अध्यापक विद्यालय व गिरिजाबाई ढोबळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजिलेल्या या उपक्रमात ३४०  विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा नवा अध्याय हाती घेतला. महापौर अलका राठोड यांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ. आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या  उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले, जयहिंद परिवाराचे बब्रुवान देशमुख, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, नगरसेविका फिरदोस पटेल, प्राचार्या वर्षां माने, प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी, प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, प्राचार्य मोहन शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ड्रीम फौेंडेशनचे प्रमुख काशीनाथ भतगुणकी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आनंद मसलखांब यांनी सूत्रसंचालन केले. तर संगीता भतगुणकी यांनी आभार मानले.