संगणकीकरणामुळे आपल्या विभाग कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अगदी सहजगत्या मिळत असल्याचा दावा महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून वारंवार करण्यात येतो. मात्र विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध नसलेली १९९६ पूर्वीची जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी मुंबईकरांना वणवण करावी लागत आहे. इमारत मोडकळीस आल्याने जुनी प्रमाणपत्रे ठेवलेले कार्यालय कामाठीपुऱ्यात स्थलांतरित झाले. पण जुन्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या फाईल्स आजही मोडकळीस आलेल्या इमारतीतच धूळ खात पडल्या आहेत तर या विभागातील कर्मचारी हाताला काम नसल्यामुळे गप्पा हाणत दिवस ढकलत आहेत.
मुंबईत जन्मलेल्या आणि मृत्यू झालेल्यांची नोंद अगदी सुरुवातीपासून, म्हणजे १८८९ पासून पालिका दफ्तरी ठेवण्यात आली आहे. १९९५ पर्यंत रुग्णालयांकडून मिळालेल्या नवजात बाळांची माहिती आणि स्मशानभूमीकडून उपलब्ध होणाऱ्या मृत्यूच्या माहितीवरून पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये नोंद केली जात असे. १९९६ मध्ये पालिकेने संगणकीकरण केल्यामुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे संगणकावर झटपट मिळू लागली. १९९६ पासून आजपर्यंतची सर्व जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे संगणकावर उपलब्ध होतात. इतकेच नव्हे तर कोणत्याही विभाग कार्यालयांमधून ती मिळविता येतात. मात्र तत्पूर्वीची प्रमाणपत्रेही संगणकावर उपलब्ध करण्याची नितांत आवश्यकता आहे.
१८८९ पासून १९९५ पर्यंतची प्रमाणपत्रे संबंधित विभागात नोंद केल्यानंतर त्याची एक प्रत पालिकेच्या फलटण रोड येथील शिवाजी मंडईमधील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यायात पाठविण्यात येत असे. त्यामुळे विभाग कार्यालयात प्रमाणपत्र काही कारणास्तव गहाळ झाले, कागद जीर्ण झाला अथवा त्यावरील तपशील अस्पष्ट झाल्यास संबंधिताला अर्ज करून फलटण रोड कार्यालयातून ते मिळविता येत होते. त्यासाठी साधारण महिनाभराचा कालावधी लागत होता. परंतु शिवाजी मंडईची इमारत धोकादायक बनल्यामुळे नोव्हेंबर २०१३ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाला कामाठीपुऱ्यातील नेत्र रुग्णालयात जागा देण्यात आली. शिवाजी मंडईची इमारत रातोरात रिकामी करण्याचा फतवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढल्यामुळे कर्मचारी दुसऱ्या दिवशी नेत्र रुग्णालयातील कार्यालयात रुजू झाले. पण १८८९ पासून जपून ठेवलेली जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे नव्या कार्यालयात हलविण्याची कोणतीच व्यवस्था प्रशासनाने केली नाही. त्यामुळे सर्व फाईल्स शिवाजी मंडईत आणि कर्मचारी नेत्र रुग्णालयाच्या इमारतीत असे त्रांगडे झाले. आता शिवाजी मंडईच्या इमारतीमध्ये प्रवेशही निषिद्ध करण्यात आला आहे.
अनेक कामांसाठी जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्राची गरज भासते. काही नागरिकांनी आपले जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विभाग कार्यालयात धाव घेतली. मात्र जन्म प्रमाणपत्र तेथे उपलब्ध न झाल्याने त्यांना फलटण रोडला पाठविण्यात आले. परंतु शिवाजी मंडईतील कार्यालय कामाठीपुऱ्याला स्थलांतरित झाल्याने ही मंडळी तेथे गेली. परंतु प्रमाणपत्रांच्या फाईल्स शिवाजी मंडईत असल्याने ते आता देता येणार नाही, असे सांगून कर्मचारी नागरिकांना वाटेला लावत आहेत. गेल्या ५०-६० वर्षांतील प्रमाणपत्रे संगणकावर उपलब्ध केली असती तर ती कुठल्याही विभाग कार्यालयांतून मिळविता आली असती आणि कार्यालयात घालाव्या लागणाऱ्या खेटय़ांमुळे ‘जन्म-मरण नको आता’ असे म्हणण्याचे वेळ नागरिकांवर आज आली नसती.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण