विवाहानंतर सात वर्षांनी बावळे दाम्पत्याच्या सहजीवनाला पालवी फुटली. सोमवारी जिल्हा रुग्णालयात महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आणि कुटुंबाचा आनंद गगनात मावेना. दैवाने भरभरून दिले, पण हा जगावेगळा आनंद काही क्षणाचाच ठरला. चार बाळांपकी तिघांचा काही वेळात मृत्यू झाला, तर एका बाळाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
गेवराई तालुक्यातील शिंदेवाडी येथील ऊसतोड मजूर असलेल्या लंका देविदास बावळे (वय २५) या महिलेला विवाहानंतर ७ वर्षांनी अपत्यप्राप्तीचे सुख मिळाले. दाम्पत्याच्या सहजीवनाला पालवी फुटल्याने कुटुंबालाही आनंद झाला. सोमवारी जिल्हा रुग्णालयात लंका यांना दाखल करण्यात आले. सकाळी आठच्या सुमारास या महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला. यात ३ मुले व मुलीचा समावेश होता. सर्वसाधारणपणे एक वा दोन बाळांचा जन्म होतो. महिलेची प्रकृती चांगली असल्याने डॉक्टरांनी बाळांच्या तपासण्या सुरू केल्या. परंतु काही वेळातच वजनाने अत्यंत कमी असलेल्या तीन बाळांनी जगाचा निरोप घेतला. एका बाळाला वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न डॉक्टर करीत आहेत.