News Flash

वाढदिवसाच्या नावानं चांगभलं..

सिंहस्थ कुंभमेळा प्रत्यक्षात अजून लांब असला तरी त्याचे वारे वाहू लागले आहेत. या महाकुंभासाठी नाशिक किती अन् कसे सजणार,

| October 14, 2012 02:11 am

सिंहस्थ कुंभमेळा प्रत्यक्षात अजून लांब असला तरी त्याचे वारे वाहू लागले आहेत. या महाकुंभासाठी नाशिक किती अन् कसे सजणार, याची आराखडेबद्ध चर्चा होत असताना अवकाशात अकस्मात धुमकेतू चमकावा, तव्दत संपूर्ण जिल्हा महाकुंभापूर्वी घटकाभर का होईना अचानक ‘नेत्रदीपक’ पद्धतीने चमकल्याचे पहावयास मिळाले. तुम्ही कोणत्याही मार्गाने जिल्ह्याच्या वेशीतून आतमध्ये प्रवेश करा, तुमचे स्वागत आमच्या वाढदिवसांच्या फलकांनी नाही झाले तर विचारा, इतका कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह ओसंडून वहात होता. या सजावटीत इतकी कल्पकता होती, की पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेले दुष्काळाचे सावट आणि त्यामुळे दाटलेले पाणी टंचाईचे मळभ कुठल्या कुठे विरून गेले.
‘ऋण काढून सण साजरा करणे’ ही उक्ती प्रत्येक सणोत्सवात अधोरेखीत होत असते. त्यात ‘ऋण’ या शब्दाला अधिक महत्व दिले गेल्याने उत्साहाची विनाकारण हेळसांड केली जाते, असे ही उक्ती प्रत्यक्षात आणणाऱ्यांची तक्रार. त्यामुळे असा ‘उत्साह’ प्रथम लक्षात घेऊन नाशिकबरोबर जळगावमध्ये अभूतपूर्व पद्धतीने साजऱ्या झालेल्या मान्यवरांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यांकडे पहावयास हवे. असेना का दुष्काळाचे सावट, त्यावर जणू आमचे ‘भाऊ’ आणि ‘नाना’ तोडगा काढणार, अशा आविर्भावात पदाधिकारी व कार्यकत्यांनी आपला अमाप उत्साह या निमित्ताने दाखवून दिला. उत्साहाच्या याच भरात कोणाचे किती कार्यक्षेत्र हे शुभेच्छा फलकांमुळे समजून येत होते. नाशिक पश्चिम व नाशिकरोड-देवळाली या मतदारसंघातील दोन्ही नानांचे चाहते काही आपापल्या मतदारसंघापुरतेच सिमित नाहीत, तर संपूर्ण शहरभर पसरलेले आहेत. त्याची प्रचिती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरात इतरत्र म्हणजे अन्य विधानसभा मतदारसंघात फलकांच्या झालेल्या गर्दीवरून लक्षात आली. उलट, ‘नाशिक पश्चिम’ सारख्या विधानसभा मतदारसंघात एकवेळ कमी सजावट झाली तरी चालेल, पण कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या सहकाऱ्याच्या ‘नाशिक मध्य’ विधानसभा मतदारसंघात नानांचे प्राबल्य अधिकाधिक ठळकपणे दर्शवून अंतर्गत राजकारणाला ‘मनसे’ फोडणी दिली गेली. भाऊंच्या चाहत्यांचे तर काही विचारायलाच नको. संपूर्ण जिल्हा व शहर हे त्यांचे असणारे कार्यक्षेत्र अतिशय कल्पक फलकांनी सजविण्यावर अनुयायांचा भर राहिला. नाशिकप्रमाणे जळगावमधील चोपडय़ातही स्थानिक ‘भाऊं’च्या कार्यकर्त्यांनी  याच पद्धतीने वाढदिवस साजरा करून आम्ही फारसे वेगळे नसल्याचे सिद्ध केले.
नाशिकमध्ये भाऊ व नाना यांचे वाढदिवस एका पाठोपाठ एक आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व शिवसेना या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलकबाजीची स्पर्धाच लागली होती. मान्यवरांची संख्या अधिक असल्याने मग जिथे जागा मिळेल, तिथे फलक उभारले गेले. मुंबई नाका, द्वारका, पाथर्डी फाटा, आडगाव नाका, सीबीएस असे अनेक प्रमुख चौक रंगीबेरंगी फलकांनी सजविण्यात आले. ही सजावट करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या लोकप्रतिनिधींना प्रसिद्धी मिळवून दिली खरी, मात्र दुसरीकडे आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सूचनांचा अव्हेर केला. नाशिकचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या विषयावरील बैठकीत अनधिकृत ठिकाणी शुभेच्छा फलक उभारले जाऊ नये, असे निर्देश दिले होते. मनसेला निवडणुकीत लक्षणिय यश मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी देखील फलक उभारण्यापेक्षा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्या, असे निक्षून सांगितले होते. परंतु, ‘भाऊ’ व ‘नाना’ यांचा वाढदिवस साजरा करताना राष्ट्रवादी व मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्याचा सोयीस्करपणे विसर पडला.
पुरेशा पावसाअभावी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळाचे सावट पसरले आहे. नाशिकचा विचार करता सद्यस्थितीत ४५ गांवे व १८१ वाडय़ांना ३५ टँकरच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगावमध्येही अनेक गावांना ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरविणे भाग पडले आहे. नाशिक शहराची पाणी कपात तुर्तास रद्द झाली असली तरी धरणांतील जलसाठा लक्षात घेतल्यास पुढील उन्हाळ्यात हा निर्णय आत्मघात करणारा ठरू शकतो. त्यातच औरंगाबाद, अहमदनगर या तहानलेल्या जिल्ह्यांकडून नाशिकमधील धरणातील पाण्याची मागणी केली जात आहे. या एकूणच परिस्थितीत सर्वसामान्यांना जे काही चटके सहन करावे लागत आहे, त्यावर फुंकर मारण्याऐवजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डागणी देण्याचे काम केले. शहरभर फलकबाजी आजकाल कोणीही करतात. त्यामुळे त्यात विशेष असे काहीच नाही. याउलट आपल्या नेत्याची प्रतिमा उंचावण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नागरिक स्वत:हून कौतुकासाठी पुढे येतील अशा काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज होती. त्यामुळे वाढदिवस खरोखरच कारणी लागल्यासारखे झाले असते. नाशिकमध्ये राजकीय व प्रशासकीय पातळीवर आगामी सिंहस्थाची तयारी सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्यासाठी आराखडय़ात नाविण्यपूर्ण योजना समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामागे नाशिकची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न असला तरी त्याचे संपूर्ण भवितव्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून आहे. या निधीतून नाशिकचे कितपत सौदर्यीकरण शक्य होईल, ते या घडीला सांगणे अवघड असले तरी त्याची कसर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विचित्र पद्धतीने नक्कीच भरून काढतील, यात कोणाला शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2012 2:11 am

Web Title: birthday hoardings kumbh mela kumbh mela nasik
टॅग : Kumbh Mela
Next Stories
1 खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
2 आता कैद्यांचा जिल्हा रुग्णालयात गोंधळ
3 जळगावच्या नेत्यांचे मतलबी राजकारण
Just Now!
X