कविवर्य ग्रेस जाऊन पाहता पाहता वर्ष उलटले.. मात्र, सरांच्या कवितांवर आणि एक माणूस म्हणून त्यांच्यावर निर्विवादपणे प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना ग्रेस सर गेले असे वाटतच नाही.. १० मे हा ग्रेस यांचा वाढदिवस.. ग्रेस सरांचा वाढदिवस म्हटला तरी तसा कुठलाही गाजावाजा नाही की, कुठलाही कार्यक्रम नाही मात्र, त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते आणि शहरातील साहित्यिक त्यांच्या धंतोलीतील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा द्यायचे आणि ग्रेस सर आत्मियतेने या शुभेच्छांचा स्वीकार करायचे.. दरवर्षी दिसणारे हे चित्र यंदा मात्र दिसणार नाही..
परंपरांगत भावलेखन करणाऱ्या कवीपेक्षा आपली पृथगात्मता जाणीवपूर्वक जपणाऱ्या कविंमध्ये ग्रेस सरांचे स्थान वेगळे होते त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा चाहतासुद्धा एका चाकोरीतला नव्हता. एकदा त्यांच्याशी जवळीक केली तरी तो त्यांचा होऊन जात होता. ग्रेस सरांनी अनेक विद्यार्थी घडविले आणि त्यातूनच अनेक विद्यार्थ्यांना आणि चाहत्यांना ते आपलेसे वाटू लागले असताना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील दोन-तीन वर्षांत प्रकृती अस्वस्थामुळे ते कोणाला फारसे भेटत नव्हते.
ग्रेस यांचे लेखनिक म्हणून अनेक वर्ष काम करणारे प्रा. तीर्थराज कापगते यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले, नागपूर शहराशी त्यांचे एक वेगळे नाते होते. त्यामुळे वाढदिवशी नागपुरातच राहणे ते पसंत करीत असत. खरे तर त्यांना वाढदिवस खूप मोठय़ा प्रमाणात साजरा करावा, समारंभ करावा हा प्रकार अजिबात आवडत नव्हता. मात्र, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे अनेक चाहते शुभेच्छा देण्यासाठी आले तर ते शुभेच्छांचा तेवढय़ाच सन्मानाने स्वीकार करायचे. वाढदिवसाला त्यांची ताजबागेची वारी ठरलेली असायची. परंतु, एखादा समारंभ आयोजित करण्याला त्यांचा विरोध होता आणि तसे ते सांगत असत. त्यांनी हयातीत कधीही मोठा समारंभ वाढदिवशी आयोजित केला नाही.
ग्रेस यांना कर्करोगाने पछाडल्यानंतर पाच-सहा वर्ष पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु, वाढदिवशी नागपुरात राहणे त्यांना अधिक पसंत होते. यादरम्यान २००८ मध्ये त्यांना येणे शक्य झाले नाही, याची खंत त्यांनी बोलूनही दाखविली होती. वाढदिवसाला शक्यतो एकांतात राहणे आवडायचे. तरीही त्यांचे चाहते घरी येऊन त्यांना शुभेच्छा देत असत. वाढदिवशी एखादी गोष्ट आपण यावर्षीपासून करायची असे काही लोक ठरवतात पण, ग्रेस सरांचे असे काहीच नव्हते. मात्र त्यांनी जर एखादी गोष्ट ठरविली तर ती ठरवून करीत असत. कुणाला काही शब्द दिला तर ते पाळत असत. शुभेच्छा देणारे पुष्पगुच्छ कशासाठी घेऊन यायचे ? असा उलट प्रश्न त्यांच्याकडून येई, असे सांगतानाच ग्रेस यांची, साहित्य संपदा जतन करून त्यांची स्मृती कायम राहावी यासाठी शासनाने त्या संदर्भात पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही कापगते म्हणाले. ग्रेस हयात नाही परंतु, त्यांची साहित्य संपदा, त्यांनी लिहिलेल्या कविता आजही जिवंत आहेत. त्यामुळे ते आजही आमच्यातच असल्याचे असे क्षणोक्षणी प्रत्येकाला वाटते, असे कापगते यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 4:14 am