नगरोत्थान योजनेतील रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत, या मागणीसाठी शहर भाजपाच्यावतीने गुरूवारी महापालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. कराराप्रमाणे १८महिन्यांच्या आत रस्ते पूर्ण करणे बंधनकारक असताना ही मुदत संपली तरी काम सुरू न झाल्याने शहर अभियंता एस.बी.देशपांडे यांना घेराओ घालण्यात आला. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
राज्य शासनाच्यावतीने शहरातील रस्ते कामांसाठी कोल्हापूर महापालिकेला १०८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून शहराच्या विविध ठिकाणी रस्ता कामांच्या निविदा प्रसिध्द झाल्या. मात्र या कामाला अपेक्षित गती आलेली नाही. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे,या मागणीसाठी शहर भाजपाच्यावतीने महापालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.     
शहर भाजपाचे अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष विजय जाधव, दिलीप मैत्राणी, अॅड.संपतराव पवार,किशोर घाटगे, यल्लाप्पा गाडीवडर, अॅड.अमिता मंत्री, पपेश भोसले, डॉ.शेलार, यशवंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रशासन सुस्त, ठेकेदार मस्त, जनता त्रस्त, नगरोत्थानचे १०४ कोटी कोठे मुरले, प्रशासन-ठेकेदार यांची अभद्र युती अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. शहर उपअभियंता एस.बी.देशपांडे यांना घेराओ घालण्यात आला. अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पावसाळ्यापूर्वी रस्ते न पूर्ण झाल्यास कार्यालयाला  टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.