05 March 2021

News Flash

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची बुथनिहाय प्रचारयंत्रणा सज्ज

युतीमध्य भाजपच्या वाटय़ास आलेल्या विदर्भातील पाच मतदारसंघांपैकी पक्षनेत्यांनी विजयाची निश्चिती मानल्या जाणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघावर विशेष

| November 29, 2013 10:01 am

युतीमध्य भाजपच्या वाटय़ास आलेल्या विदर्भातील पाच मतदारसंघांपैकी पक्षनेत्यांनी विजयाची निश्चिती मानल्या जाणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले असून वर्धा जिल्हा व अमरावती जिल्ह्य़ातील बुथप्रमुखांना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. भाजपच्या वाटय़ातील अन्य मतदारसंघांवर संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याची सूचना मिळाली असून भाजपने जिंकण्याचे ध्येय ठेवलेल्या वर्धा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्याचे पक्षवर्तुळातून ऐकायला मिळाले. कांॅग्रेसकडून यावेळी उमेदवार बदलल्या जाण्याची हमखास शक्यता गृहित धरून भाजप नेतृत्व थांबा आणि पाहा, अशा भूमिकेत असल्याचे चित्र आहे.     
उमेदवार पुढे कुणीही ठरो मात्र, निवडणुकीची सर्व ती यंत्रणा पक्षाने कामाला लावली आहे. या मतदारसंघात एकूण १८९२ बुथ आहेत. यापैकी वर्धा जिल्ह्य़ात १२३८ व अमरावती जिल्ह्य़ातील धामणगाव व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील ६५४ बुथ आहेत. एका बुथवर हजार ते पंधराशे मतदार गृहित धरले जातात. उत्तरप्रदेशात बसप नेत्या मायावती यांची सर्व प्रचारयंत्रणा बुथनिहायच वर्षभर कार्यरत असते. एका बुथच्या परिघातील निवडक १५ ते २० निष्ठावंत कार्यकर्त्यांंकडे या परिसराची धुरा सोपवून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. भौगोलिक सीमेऐवजी मतदारकेंद्रित प्रचारयंत्रणा या पध्दतीने हलविण्यावर यावेळी भाजपने कटाक्ष ठेवला आहे. बहुतांश लोकसभा मतदारसंघात दोन जिल्हे मोडतात. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्य़ातील नेत्यांचा परस्परसमन्वय नसतो. परिणामी, प्रचारातील एकसूत्रता मागे पडते.
हे होऊ नये म्हणून भाजप नेत्यांनी दोन्ही जिल्ह्य़ातील नेत्यांची व बुथप्रमुखांची एक संयुक्त सभा बुधवारी, २८ नोव्हेंबरला आयोजित केली होती. प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फ डणवीस, संघटनमंत्री रवींद्र भुसारी, डॉ. उपेंद्र कोठेकर हे प्रमुख मार्गदर्शक राहणार आहे, तसेच अमरावती जिल्ह्य़ातील अरुण अडसड, प्रकाश पाटील भारसाकळे, आमदार प्रवीण पोटे, माजी आमदार साहेबराव तट्टे, किरण पातुरकर, निवेदिता चौधरी, वर्धा जिल्ह्य़ातील आमदार दादाराव केचे, रामदास तडस, विजय मुडे, सुरेश वाघमारे, सुधीर दिवे ही नेत्यांची फ ौज बुथप्रमुखांना संबोधण्यासाठी होती. जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे म्हणाले, बुथप्रमुखांना केंद्रस्थानी ठेवून सभेचे आयोजन झाले असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्य़ात सर्वाधिक नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य ताब्यात ठेवणाऱ्या भाजपचे सहापैकी चार नगरपालिकेवर कमळ उमललेले आहे. वर्धा जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या बरोबरीने सदस्यसंख्या ठेवणाऱ्या भाजपने अपक्षाच्या मदतीने पुढील काळात जिल्हा परिषदेतही सत्ता काबीज करण्याचा मनसुबा ठेवला आहे. जिल्हा परिषद व नगर पालिका सदस्यांची अशी फ ौज असली तरी मतदारसंख्यानिहाय या सदस्यांना सर्वाशी संपर्क ठेवणे अशक्य ठरते. या पाश्र्वभूमीवर बुथनिहाय प्रचारयंत्रणेचे शस्त्र भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज ठेवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 10:01 am

Web Title: bjp campaigning for lok sabha election in wardha
टॅग : Lok Sabha Election
Next Stories
1 पदवीदान समारंभ, २५० महाविद्यालयांचा प्रश्न आणि वकिलाची अकार्यक्षमता गाजली
2 विशेष कार्यकारी अधिकारीपदाला बारावी नापास नगरसेवक मुकणार
3 ध्वजदिन निधी संकलनातील गैरप्रकार टाळण्यासाठी आता समित्या
Just Now!
X