धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून अंतिम उमेदवार ठरविताना पक्षातंर्गत पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. हा पेच सोडविण्यासाठी आता माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हेा सोमवारी मालेगाव आणि धुळ्याची दौरा करणार असूने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यांनी या संदर्भात दिलेल्या अहवालानंतर धुळ्याचा भाजप उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता पक्ष सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील निवडणुकीत मतदार संघ पुनर्रचनेनंतर सर्वसाधारण झालेल्या या मतदार संघात भाजपकडे उमेदवारांची वानवा होती.अशा स्थितीत पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रतापदादा सोनवणे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि काँग्रेसच्या अमरिशभाई पटेल यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवाराला पराभूत करून ते विजयी झाले होते. या वेळी मात्र पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची यादी बरीच मोठी आहे  पाच वर्षांत सोनवणे यांनी मतदार संघात फारशी कामे न केल्याने त्यांच्याविषयीची नाराजी आणि प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना उमेदवारी देऊ नये असे एका गटाचे म्हणणे आहे. उमेदवारीच्या स्पर्धेतून बाद करण्यासाठीच मुद्दाम आपल्या प्रकृतीविषयी दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात येत असल्याचा आरोप खा. सोनवणे यांनी प्रतिस्पध्र्यावर केला आहे. आपल्या विरोधात वातावरण निर्मिती करणाऱ्यांमध्ये पक्षाचा एक पदाधिकारी गुंतला असल्याचा थेट आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिली.
मालेगाव येथील पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आणि सध्या जनराज्य आघाडीचे कार्याध्यक्ष असलेले अद्वय हिरे हेही भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.गेल्या महिन्यात संक्रातीच्या दिवशी हिरे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले होते. परंतु ऐनवेळी हा प्रवेश सोहळा स्थगित झाला. याखेरीज धुळ्यातील काँग्रेसचे डॉ. सुभाष देवरे, शिवसेनेचे नेते डॉ.सुभाष भामरे, सुरेश पाटील, लोकसंग्राम पक्षाचे आमदार अनिल गोटे, सटाण्याचे  डॉ. संजय पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.
मूळ धुळ्याचे आणि सुरतचे माजी उपमहापौर डॉ. रवींद्र पाटील, मालेगाव तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनीही उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे जाहीर केले आहे. इच्छुकांच्या गर्दीमुळे भाजपपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पक्ष्ोनिरीक्षक पाठवून हा पेच सोडविण्याचा पर्याय पुढे आला आहे.