अर्थसंकल्पापूर्वी राज्य सरकारने वैधानिक विकास मंडळाच्या खर्चाचा अहवालही दिला नसल्याचे पत्र खुद्द राज्यपालांनीच सरकारला पाठविले आहे. समतोल विकास करणे दूरच, पण त्यावरील खर्चाची आकडेवारीही सरकार राज्यपालांना देत नसेल, तर सरकारवर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ उद्या (गुरुवारी) राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
मराठवाडा, विदर्भ व खान्देश विकासासाठी ३७१ (सी) कलमान्वये राज्यपालांना तरतूद करण्याचे अधिकार आहेत. मात्र, ही तरतूद सरकारने पायदळी तुडवली. सिंचन व्यवस्थेचा निधी वाटप करताना राज्यपालांच्या निर्देशाचे सरकारने उल्लंघन केले. त्यामुळे राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात सरकारवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने केली जाणार आहे. परभणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाईही चुकीची आहे. सरकार लाठी-काठी व बंदुकीच्या जोरावर शेतकऱ्यांची आंदोलने दडपून टाकत आहे. मावळ येथील शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार ५५० कोटींच्या व्यवहारातून घडल्याचा आरोप तेव्हा केला होता. त्यावर नव्याने सादर केलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब झाल्याचे मुंडे म्हणाले.
टोलमुक्ती कशी होऊ शकेल, याची योजना तयार असून त्यासाठी कर्ज घेऊन कंत्राटदारांचे ३५ हजार कोटी रुपये एका वर्षांत परत केले जातील. जेणेकरून टोलमुक्ती करणे शक्य होईल. नव्याने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारला कर्ज घेण्यात अधिक वाव आहे, असे विधान राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केले होते. त्याचा तिरकस समाचार घेत मुंडे म्हणाले की, आता कर्ज घ्यायला वाव आहे, असे अर्थमंत्र्यांनीच जाहीर केले असल्याने टोलमुक्तीसाठी तो पर्याय निवडला जाईल. त्याचबरोबर काही अधिभार लावण्याचीही योजना महायुतीकडे आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
टोलमुक्तीचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीचा होता. एकटय़ा मुंडे यांचा निर्णय नाही. महायुतीचा प्रवक्ता म्हणून तो मी जाहीर केला. मी महायुतीचा एकपंचमांश नेता आहे. सर्वानी सांगितले म्हणून, मी ती घोषणा केली. नितीन गडकरींची भेट झाल्यानंतर टोलमुक्तीविषयी त्यांना सांगू, असेही ते म्हणाले.
निवडणुकीच्या काळात मनसेचे वागणे राजकीयदृष्टय़ा मित्रत्वाचे की शत्रुत्वाचे, असे विचारले असता मुंडे म्हणाले की, ते आमचे सध्या मित्र नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेशी युती होण्याची अजिबात शक्यता नाही. निवडणुकीनंतर मात्र तेव्हाचे तेव्हा बघू, असे म्हणत त्यांनी हा विषय टोलवला. उस्मानाबादची जागा भाजपला मिळण्याची अजिबात शक्यता नाही. २६/२२ असे सूत्र ठरले आहे. त्यात उस्मानाबादच्या जागेचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघातून भाजपनेते सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.