निवडणूक आल्याने राज्यात ‘टोल’वरुन पेटवा पेटवीचे वातावरण निर्माण केले जात आहे, दुसरा कोणता विषय नाही, त्यामुळे तोडफोड पहावी लागत आहे, खरेतर शिवसेना-भाजप सरकारच्या काळातच महाराष्ट्रात टोल सुरु झाले आहेत. परंतु तेच आज आमचे सरकार आले तर टोल बंद करु, अशी भाषा वापरत आहेत, प्रथम त्यांनी गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या त्यांचे सरकार असलेल्या राज्यातील टोल बंद करुन दाखवावेत, असे आव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
शहरातील बाह्य़वळण रस्त्यावरील, निंबळक (ता. नगर) येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी भुजबळ शनिवारी सकाळी ते नगरला आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. पालकमंत्री मधुकर पिचड यावेळी उपस्थित होते.
राज्यात २ लाख ४० हजार किलोमीटरचे रस्ते आहेत, यापैकी केवळ १ टक्के रस्त्यावर टोल आकारणी केली जाते, ९९ टक्के रस्ते टोलमुक्त आहेत. राज्यातील २६ जिल्हे चौपदरी रस्त्यांनी जोडले गेल्याने तेथे विकासाचा वेग वाढला आहे. सेना-भाजपने तर केवळ पुणे-मुंबई हा एकच रस्ता चौपदरी केला, सध्या केंद्र व राज्याचा निधी तसेच खासगी क्षेत्र यांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत, राज्याने एवढा पैसा आणायचा कोठून, असे सांगताना भुजबळ यांनी बीओटी व टोलवसुली सुरुच राहील, मात्र कोठे चुका होत असतील तर निदर्शनास आणा त्यात दुरुस्ती करु असे स्पष्ट केले.
गुजरातची स्तुती, उदोउदो करणाऱ्यांनी, गुजरातमध्येही टोलवसुली केलीच जाते हे लक्षात घ्यावे, आता निवडणुका आल्याने पेटवा-पेटवी केली जात आहे. टोल व बीओटी बंद केले तर राज्याचा विकास ठप्प होईल, एकीकडे विकासावर बोलायचे आणि दुसरीकडे विकासात अडथळे आणायचे ही लबाडी आहे, टोल वसुली केवळ गाडीवाल्यांकडून केली जाते, सर्वसामान्यांकडून नाही, बीओटीमुळे रस्ते चांगले होऊन वाहनांची देखभाल दुरुस्ती कमी झाली, वेळ वाचला, इंधनात बचत झाली, त्यातून हा पैसा द्यावा लागत आहे, अर्थसंकल्पातील तरतुदीतून रस्ते उभारले तर त्याचा सर्वसामान्यांवरच बोजा पडेल, जगभर ही संकल्पना मान्य झाली आहे, असे भुजबळ म्हणाले.
पक्षाने आदेश दिला तर..
पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभेची निवडणूक लढवू या भूमिकेचा भुजबळ यांनी पुनरुच्चार केला. पक्षाने अद्याप त्याबाबत आदेश दिलेला नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे बहुतेक मंत्री भ्रष्ट असल्याने त्यांनी निवडणूक लढवावीच, असे आव्हान भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिले आहे, त्याकडे लक्ष वेधले असता, निवडणूक जवळ आली आहे, एवढीच प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली.