युतीतील मित्रपक्ष शिवसेनेला फाटा देत भारतीय जनता पक्षाने मंगळवारी प्रचाराचा शुभारंभ केला. शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात महाआरती करून नंतर शहराच्या मध्यवर्ती भागातून फेरी काढण्यात आली.
भाजपचे खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर हे प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते. पक्षाचे जुने व ज्येष्ठ नेते गुलशन जग्गी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. एरवी युतीच्या एकत्रित कार्यक्रमाने प्रचाराचा शुभारंभ होतो, मात्र दोन्ही पक्षांमध्ये ताणलेल्या संबंधांच्या पाश्र्वभूमीवर आज भाजपने एकटय़ानेच ही सुरुवात केली. या सर्व नेत्यांसमवेत शहरातून प्रचारफेरी काढण्यात आली. पक्षाच्या उमेदवारांसह सदाशिव देवगावकर, सुनील रामदासी, गौतम दीक्षित, सचिन पारखी, श्रीकांत साठे, गीता गिल्डा आदी पदाधिकारी या पेरीत सहभागी झाले होते.
शुभारंभाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ढाकणे यांनी भाजप-शिवसेना युतीतील संबंध ताणल्याचे मान्य केले, मात्र ते टोकाला जाणार नाहीत असा निर्वाळा दिला. युती अभेद्य असून परस्परातील गैरसमज दूर होतील, येत्या एकदोन दिवसांत सर्व काही व्यवस्थित होईल असे ते म्हणाले. तसेच युतीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात प्रचारफेरीची सांगता झाली.
बंडखोर कुलकर्णीची आगपाखड
भाजपच्या प्रचार फेरीदरम्यान स्वामी विवेकानंद चौकाजवळ पक्षाचे बंडखोर नरेंद्र कुलकर्णी व नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रभाग क्रमांक २१मधून पक्षाने त्यांच्या घरात उमेदवारी न देता ज्योती देवगावकर यांना उमेदवारी दिली असून, तेव्हापासून येथे असंतोष धुमसतो आहे. ही फेरी येथे आली, त्या वेळी कुलकर्णी हजर होते. भाजपचे नेते स्वामी विवेकानंद यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी थांबले असतानाच कुलकर्णी यांनी खासदार गांधी व आगरकर यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांचा खरा राग आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर आहे, त्यांनाही कुलकर्णी यांनी लक्ष्य केले होते, मात्र ते येथून पुढे निघाले. अन्य नेत्यांना मात्र कुलकर्णी यांनी लाखोली वाहिल्याचे समजते. या प्रकाराने सारेच आवाक झाले. सर्वासमक्ष हा प्रकार सुरू असताना भाजपच्या नेत्यांनी मात्र या गोष्टीला फारसे महत्त्व न देता त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र या प्रकाराने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.