कळव्यापासून अंबरनाथपर्यत पसरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात बंडखोर खासदार आनंद परांजपे यांना अस्मान दाखविण्याचे बेत आखणाऱ्या शिवसेनेला येथून तोडीचा उमेदवार सापडेनासा झाल्याने मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर दावा सांगत आतापासूनच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. सुमारे दोन ते अडीच लाखांच्या घरात असलेले ब्राह्मण, सीकेपी मतदार आणि कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये असलेले पक्ष संघटन या बळावर कल्याण आम्हाला द्या, असा दबाव भाजपकडून वाढू लागल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता व्यक्त होऊ लागली आहे. डोंबिवलीतील भाजपच्या एका मोठय़ा पदाधिकाऱ्याने कल्याण पदरात पाडून घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा सुरू केल्याने प्रदेश स्तरावरही यावर गांभीर्याने विचार केला जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कल्याणवर दावा सांगायचा आणि भिवंडीची जागा शिवसेनेसाठी सोडायची, अशा स्वरूपाचा प्रस्ताव युतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता असून यावरून दोन मित्रपक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये आतापासूनच कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
वडील प्रकाश परांजपे यांची पुण्याई आणि शिवसेनेची संघटनात्मक ताकद या बाळावर गेल्या लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपे यांनी वसंत डावखरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला. हेच परांजपे पुढे राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेत संतापाची भावना असून काहीही झाले तरी परांजपे यांना पराभवाची धूळ चारायची, अशा बेताने यंदाची निवडणूक शिवसेनेकडून प्रतिष्ठेची केली जाण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी परांजपे यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून शिवसेनेच्या गोटात कमालीचा संभ्रम असून या संभ्रमावस्थेचा फायदा उचलण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपपेक्षा शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक असली तरी कल्याण, डोंबिवलीतील संघाची ताकद, ब्राह्मण मतदारांचे प्राबल्य आणि नरेंद्र मोदी यांच्या हवेवर स्वार होऊन भाजपला हा मतदारसंघ सोपा जाईल, असा येथील स्थानिक नेत्यांचा दावा आहे. डोंबिवलीतील पक्षाच्या एका मोठय़ा पदाधिकाऱ्याने कल्याणसाठी आग्रह धरला असून शेजारचा भिवंडी मतदारसंघ शिवसेनेला द्या, असा प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपुढे मांडला आहे. परांजपे यांच्या तोडीस तोड अशा उमेदवाराच्या शोधात शिवसेनेचे नेते आहेत. सुशिक्षित, अभ्यासू, तरुण असा उमेदवार परांजपे यांच्या विरोधात उभा करायला हवा, याविषयी शिवसेनेत एकमत आहे. परंतु, अशा उमेदवाराचा शोध अद्याप पक्षातील नेत्यांना लागलेला नाही. त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला द्या, असा आग्रह भाजपचे स्थानिक नेते धरू लागले असून दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला तरी तेथे पक्षाची ताकद फारशी नाही. तुलनेने भिवंडी पश्चिम आणि शहापुरात शिवसेनेची ताकद असून येथील इतर विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भिवंडी शिवसेनेला सोडा आणि कल्याणवर दावा सांगा, असा प्रस्ताव भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेश नेत्यांपुढे ठेवला आहे. डोंबिवलीतील भाजपच्या एका मोठय़ा पदाधिकाऱ्याने शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्य़ातील एका बडय़ा नेत्यालाही यासाठी गळाला लावण्यास सुरुवात केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
भाजपचा आटापिटा मान्य होणार नाही : लांडगे
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपला तो सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केले. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्यासोबत आमची बैठक झाली. पाटील यांनी शिवसेनेने लवकर उमेदवार जाहीर करावा, असे मत या वेळी मांडले. जगन्नाथ पाटील यांच्यासारखा नेता शिवसेना उमेदवाराचे काम करण्यासाठी उत्सुक असताना भाजपमधील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल्याणसाठी आटापिटा सुरू आहे. भाजपमधील काही ठराविक पदाधिकाऱ्यांचा हा आटापिटा शिवसेना कदापी मान्य करणार नाही, असा दावा लांडगे यांनी केला.