भाजपचा जाहीरनामा देशाला भ्रमात टाकणारा असून यात नवे काहीच नाही. त्यातील सर्व काही यूपीए सरकारने आधीच केले असल्यामुळे हा जाहीरनामा हास्यास्पद ठरला असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली.
विलास मुत्तेमवार व मुकूल वासनिक यांच्या प्रचारासाठी नागपुरात आले असता आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी व भाजपवर सडकून टीका केला. भाजपचा बहुप्रतीक्षित जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला असून त्यात नवे काहीच नाही. ट्रेडिशन, ट्रेड, टॅलेंट, टुरिझम व टेक्नॉलॉजी या पाच टींवर त्यात भर दिला आहे. परंपरा व कौशल्य या दोन भारतीय बाबी जगविख्यात आहेत. गुजरातमध्ये पर्यटनवाढीस वावच दिला गेलेला नसल्याने त्यात नवे काय देणार? एनडीएच्या काळात भारताचा व्यापार १५६ अरब अमेरिकी डॉलर होता. काँग्रेसच्या राज्यात तो ८२५ अरब अमेरिकी डॉलर झाला. भाजपच्या काळात गुंतवणूक २८५ बिलियन डॉलर्स होती. यूपीएच्या काळात ती २८५ बिलियन डॉलर्स झाली. माहिती तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करतो. जगभरात मंदी असतानाही यूपीएच्या कार्यकाळात व्यापार आणि गुंतवणूक वाढली. आम्ही करून दाखवले. भाजप आता नवे काय करणार, असा सवाल शर्मा यांनी केला.
एनडीए काळात आरोग्यासाठी २८ हजार कोटी तरतूद होती. यूपीए काळात ती ३६ हजार कोटी रुपये झाली. त्यामुळे आरोग्यविषयक सोयी वाढून पुरुषाचे पाच, तर महिलांचे सहा वर्षे आयुष्यमान वाढले. शिक्षणासाठी यूपीएच्या काळात ८० हजार कोटी रुपये तरतूद झाली. यूपीएची सर्वच धोरणे भारताला पुढे नेणारी आहेत. जीएसटीला भाजपने याआधी प्रत्येक वेळी विरोध केला. आता ते जाहीरनाम्यातून जीएसटी वाढवू म्हणतात, त्यांचे हे वागणे अत्यंत खोटे आहे. नागपूरजवळील उमरेडसह राज्यात १६ औद्योगिक शहरांच्या निर्मितीस यूपीएनेच मंजुरी दिली आहे. भाजपचा जाहीरनामा म्हणजे जमिनीवरील वास्तविकता नाकारणे असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.
मुळात ही निवडणूक म्हणजे दोन विचारधारांची लढाई आहे. सर्वसमावेशक, बहुभाषीय, बहुधर्मीय अशी काँग्रेसची विचारधारा आहे. या उलट संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपचा विचार संकीर्ण, धर्माच्या नावावर विभाजन करणारी विचारधारा आहे. फॅसिस्ट, हिटलरच्या जवळची ही संघ व भाजपची विचारसरणी असल्याचा आरोप करीत शर्मा यांनी मोदी व भाजपवर खरपूस टीका केली. व्यक्तीवादाला प्रोत्साहित करणारा भाजप प्रचंड पैसा खर्च करीत आहे.
गुजरात मॉडेल एक थोतांड असून गुजरातवर आज १ लाख ३८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गुजरात विधिमंडळाचे कामकाज केवळ वर्षांतून २३ दिवस चालते. विरोधी सदस्यांना वारंवार निलंबित केले जाते. विधिमंडळाचे वृत्तांकन करण्यासाठी केवळ प्रसिद्ध माध्यमांना प्रवेश दिला जातो, हे गुजरातचे राजकीय मॉडेल असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. अनीस अहमद व नाना गावंडे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.