लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांपाठोपाठ माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार हंसराज अहीर व आमदार नाना शामकुळे यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. नगरसेवक व वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत कलहाचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी या त्रिकुटाची चांगलीच झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असतांना भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह नगरसेवकांच्या माध्यमातून समोर आला आहे. खासदार व आमदाराविरूध्द बंड पुकारणाऱ्या या नाराज १३ नगरसेवकांची बैठक आमदार सुधीर मुनगंटीवार व खासदार हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामगृहावर बुधवारी झाली. या बैठकीला नगरसेविका अंजली घोटेकर, बलराम डोडाणी, सुनिता वाकोडे, जयश्री गेडाम, रत्नमाला वायकर, जयश्री जुमडे, माधुरी बुरडकर, सुषमा नागोसे, स्वरूपा आसवानी, देवानंद वाढई, तुषार सोम, अमरजितसिंह कौर धुन्ना या नाराज नगरसेवकांसह संतुष्ट नगरसेवक राहुल पावडे, धनंजय हुड, अनिल फुलझेले, गटनेते वसंता देशमुख हजर होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कक्ष क्रमांक एक मध्ये तर खासदार अहीर यांनी कक्ष क्रमांक दोनमध्ये वेगवेगळय़ा बैठका घेतल्या. त्यामुळे नगरसेवकांसोबतच मुनगंटीवार, अहीर व आमदार नाना शामकुळे यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. नाराज नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेवू अशी सूचना मुनगंटीवार यांनी अहीर यांना केली होती. मात्र अहीर यांनी मुनगंटीवारांची सूचना धुडकावून लावत स्वत:चे गटाचे नगरसेवकांशी चर्चा केली. त्यावर मुनगंटीवार यांनी सुध्दा त्याच पध्दतीने नगरसेवकांची मते जाणून घेतली. यावेळी नगरसेवकांनी बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी एकमुखी मागणी लावून धरली. कासनगोट्टवार यांच्यामुळेच पक्षात वादळ उठलेले आहे. एक कंत्राटदार व्यक्ती नगरसेवकांचे नाव डावलून फलकावर स्वत:चे नाव लिहित आहे. पक्षाच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांची नावे सुध्दा फलकातून गाळली जात आहे याकडे सुध्दा नगरसेवकांनी या दोन नेत्यांचे लक्ष वेधले. कासनगोट्टवार पक्षात अशा पध्दतीने वावरत असतील तर आम्ही १३ नगरसेवक एकाच वेळी बाहेर पडू अशी धमकीच नगरसेवकांनी दिल्याने या दोन्ही नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. शेवटी अहीर व मुनगंटीवार यांनी १३ नाराज नगरसेवकांची समजूत काढतांना प्रभागातील कुठल्याही कामातून नगरसेवकांना डावलले जाणार नाही, उद्घाटन, भूमिपूजन व अन्य कार्यक्रमाला मानसन्मान दिला जाईल व सर्वाची नावे फलकांवर पूर्वीसारखीच दिसणार असे आश्वासन दिले. कासनगोट्टवार यांचा लवकरच निर्णय घेवू असेही या नेत्यांनी सांगितले. तसेच आमदार नाना शामकुळे यांच्या बद्दलही नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. शामकुळे व कासनगोट्टवार या जोडगोळीमुळे या जिल्हय़ात पक्ष रसातळाला जात असल्याची नगरसेवकांची भावना ऐकून या दोन्ही नेत्यांनी या जोडगोळीची चांगलीच झाडाझडती घेतली.
भाजपमधील हा अंतर्गत वाद राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचलेला आहे. मुनगंटीवार, अहीर व शामकुळे या वरिष्ठ नेत्यांमधील मतभेदाचा परिणाम लोकसभा निवडणूकीवर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रदेश व राष्ट्रीय पातळीवर नेत्यांनी या तिघांची चांगलीच झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपातील हा अंतर्गत कलह समोर आल्याने नगरसेवकांसोबतच नेत्यांना सुध्दा भांडणे विसरून कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्या. तरीही नगरसेवक व नेत्यांच्या मनात खदखदनारा असंतोष निवडणूकीच्या तोंडावर कधीही बाहेर पडू शकतो हे वरिष्ठ नेत्यांनी ध्यानात ठेवून किमान लोकसभा निवडणूकीपर्यंत तरी जबाबदारीचे भान ठेवावे अशी सूचना प्रदेशपातळीवरून देण्यात आलेल्या आहेत.