भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अभय आगरकर व महानगरपालिकेतील पक्षाचे गटनेते दत्तात्रेय कावरे यांना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मनपातील स्वीकृत सदस्याची निवड आणि पक्षाच्या बूथ समित्यांबाबत हलगर्जीपणा असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.
प्रदेश कार्यालयाच्या या कारवाईने भाजपच्या शहर शाखेतील दुफळी पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. मनपाच्या स्वीकृत सदस्यत्वासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महेंद्र गंधे (भैया) यांच्या नावाची शिफारस केली होती. तसा आदेशच त्यांनी आगरकर व कावरे यांना बजावला होता. मात्र तो आपल्याला मिळाला नाही असे स्पष्ट करून आगरकर यांनी या पदावर स्वत:चीच वर्णी लावून घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याला कावरे यांनाही जबाबदार धरण्यात आल्याचे समजते. मनपातील गटनेत्यानेच स्वीकृत नगरसेवकाची शिफारस विहित नमुन्यात प्रशासनाला द्यावी लागते. मात्र कावरे यांनी आगरकर यांच्या नावाचीच शिफारस केली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याने त्याच वेळी हा विषय पक्षाच्या वर्तुळात चर्चेचा ठरला होता. त्यावर आता कारवाई करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, आगरकर यांनी बुधवारी सायंकाळी ‘लोकसत्ता’शी बोलताना कारणे दाखवा नोटिशीबाबतचे कोणतेच पत्र अद्यापि आपल्याला मिळाले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, आज दिवसभर आपण बाहेरगावी होतो. मात्र सायंकाळपर्यंत असे पत्र आपल्यापर्यंत आलेले नाही. तसे पत्र मिळाले तरी पक्षशिस्तीच्या चौकटीतच आपण त्यावर कार्यवाही करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या ‘वन बूथ-टेन यूथ’ मोहिमेबाबतही आगरकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. या मोहिमेनुसार शहरात अपेक्षित काम होऊ शकलेले नाही असा आक्षेप घेण्यात आला असून, त्याचाही या नोटिशीत उल्लेख असल्याचे समजते. शहरात पक्षात मोठी गटबाजी असून त्यातील स्थित्यंतरात आगरकर आता खासदार दिलीप गांधी समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. मागच्या काही महिन्यांत त्यांनी गांधी यांच्याशी जुळवून घेत नवी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र या नोटिशीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या वर्तुळात उत्सुकता व्यक्त होते.
मुंबईच्या वाटेवरून मागे?
मिळालेल्या माहितीनुसार आगरकर व कावरे यांना आजच मुंबईला प्रदेश कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यानुसार ते निघालेही होते. मात्र निम्म्या रस्त्यातच पुन्हा येऊ नका असा निरोप मिळाल्याने ते दोघेही मधूनच नगरला परतल्याचे समजते.