भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे आता ३१ऑक्टोबरला होणारा शपथविधी सोहळा याची डोळा पाहण्यासाठी विदर्भातून दोन ते तीन हजार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि फडणवीस यांचे समर्थक गुरुवारी आणि शुक्रवारी मिळेल त्या वाहनाने मुंबईला जाणार आहेत.  काही कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्ेा बहुमत बघता राज्यात भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असताना मंगळवारी विधिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विदर्भासह नागपूर शहरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विधिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीसाठी मंगळवारी रात्री शहर अणि जिल्ह्य़ातील अनेक आमदार विमानाने रवाना झाले असले तरी काही प्रमुख पदाधिकारी, माजी आमदार  आणि खासदारांसह कार्यकर्ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. शपथविधी सोहळा अनुभवण्यााठी शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती मुंबईला जाणार आहेत. शिवाय पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंची संख्या बघता सर्वच कंपन्यांनी २९,३० आणि ३१ ऑक्टोबर असे तीन दिवस विमानांच्या तिकिटांचे दर वाढवले असून ती मिळणे कठीण झाले आहे.  
अनेकांनी मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे आरक्षण केले आहे. त्यामुळे २९ आणि ३० ऑक्टोबरला मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाडय़ांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी खासगी वाहनाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषकरून देवेंद्र फडणवीस यांचे शालेय आणि महाविद्यालयीन मित्र खासगी गाडय़ांनी गुरुवारी रात्री रवाना होणार आहेत. भाजपचे अनेक नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे सदस्य मुंबईत गुरुवारी रवाना होणार आहे. महापौर प्रवीण दटके, माजी महापौर अनिल सोले मुंबईला पोहोचले आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्य़ांतील पदाधिकारी खासगी वाहनाने जाणार आहेत. शहर आणि जिल्ह्य़ातील सर्वच नवनिर्वाचित आमदार मंगळवारी रात्री विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले आहे. उपराजधानीतील मुख्यमंत्री असल्यामुळे मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.