राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जंगी नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या येथील नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी चाप लावला आहे. श्रेष्ठीच्या नकारघंटेमुळे हा सत्कार सोहळा रद्द करण्याची वेळ या नेत्यांवर आली आहे. राज्यात दुष्काळ असताना सुद्धा भाजपचे नेते अजूनही सत्कारात रमले असल्याचे या प्रकरणात दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर काही दिवस मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे समोर आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी विदर्भातील आमदारांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी शुभेच्छाचे निमित्त साधून वाडय़ावर शक्तीप्रदर्शन केले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित झाली होती. या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असताना केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या नेतेपदी घोषणा केली आणि नागपूरसह राज्यातील विविध भागात जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी सोहळा आटोपला. तीन दिवसांनी उपराजधानीत आल्यावर त्यांचे विमानतळ ते धरमपेठ निवासस्थान या मार्गावर भव्य स्वागत करण्यात आल्यानंतर त्यावेळी झालेल्या एका छोटेखानी सत्कार समारंभात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.
सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील पदाधिकारी कामाला लागले. पंधरा दिवसांपूर्वी या सत्कार समिती स्थापन करण्यासाठी धंतोलीतील कार्यालयात महापौर प्रवीण दटके आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीला जिल्हा आणि शहरातील सर्व आमदारासह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सत्कार सोहळ्याचे स्वरूप ठरवण्यात आले होते. मात्र, तारीख, वेळ आणि जागेबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. या सत्कार सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावे या दृष्टीने पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली होती. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी हा सत्कार सोहळा होणार होता. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने या सत्कार सोहळ्याला नकार देत मंत्र्याचे सत्कार सोहळे न करता राज्यात काम करा, असा सल्ला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अधिवेशनाच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार होणार असल्यामुळे कामाला लागलेले विदर्भातील त्यांचे समर्थक आणि आमदार कार्यक्रम रद्द झाल्यामुळे नाराज झाले असून त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांना या संदर्भात विनंती करणार असल्याची माहिती मिळाली.
या संदर्भात शहर अध्यक्ष आणि सत्कार समितीचे प्रमुख आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचे आयोजन करण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली होती. त्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय नेतृत्वाकडून सत्कार समारंभाला नकार दिल्याने आणि मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थिती बघता फडणवीस यांनी सत्काराला नकार दिल्यामुळे तूर्तास हा सत्कार सोहळा स्थगित केला आहे. मात्र, याबाबत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे खोपडे यांनी स्पष्ट केले.