देवळाली छावणी मंडळाच्या निवडणुकीत ६ जागा पटकावत भाजप-रिपाइं आघाडीने वर्चस्व मिळविले असून शिवसेना व अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. आजतागायत स्थानिक पॅनलमार्फत लढविली गेलेली ही निवडणूक प्रथमच पक्षचिन्हावर लढली गेली. त्यात वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांच्या बळावर भाजपने बाजी मारली. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनीही भाजपच्या तिकीटावर विजय संपादित केला. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा यशस्वी झालेला प्रयोग भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अंमलात आणण्याची व्यूहरचना केली आहे. ही निवडणूक त्याचे उदाहरण ठरली.
देवळाली छावनी मंडळाची निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली. रविवारी या निवडणुकीसाठी ७० टक्के मतदान झाले होते. एकूण ७२ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी नूतन विद्या मंदिर येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. छावणी मंडळाची निवडणूक प्रथमच पक्षीय चिन्हांवर होत असल्याने राजकीय पक्षांचे निकालाकडे लक्ष होते. या निवडणुकीत भाजप-रिपाइं आघाडीच्या प्रभावती धिवरे, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, दिनकर आढाव, बाबुराव मोजाड, मिना करंजकर हे विजयी झाले. शिवसेनेच्या आशा गोडसे तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या कावेरी कासार यांनी विजय संपादीत केला. मोजाड यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त केला. छावणी मंडळावर सर्वाधिक जागा जिंकून भाजप-रिपाइं आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे इतर पक्षांकडील मंडळी भाजपमध्ये दाखल झाली. खरी लढत राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेत झाली. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तळ ठोकून प्रचार मोहीम राबविली.