एसटी बसचालकाला शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण करण्याची घटना आज सकाळी बसस्थानकासमोर घडली. त्यामुळे संतापलेल्या वाहनचालकांनी एकजूट करत कामबंद आंदोलन छेडले. सुमारे साडेतीन तास ठप्प पडलेली वाहतूक सबंधितांवर गुन्हे दाखल केल्यानंतर पूर्ववत सुरू झाली. मात्र यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
संगमनेर आगाराची नाशिक-नगर बस (एमएच १४-बीटी ३३४७) घेऊन बसचालक अल्ताफ शेख बसस्थानकात येत होते. त्याचवेळी बसस्थानकाबाहेर येत असलेल्या कारला त्यांनी चकवा देण्याचा प्रयत्न केला. बस थेट अंगावर आल्याने कारमधील भाजपचे नगरसेवक राधावल्लभ कासट व शिवसेनेचे नगरसेवक कैलास वाकचौरे भांबावून गेले. कार बाजूला घेत त्यांनी याबाबत बसचालकाला विचारणा केली. शब्दाशब्दाने भांडण वाढत जाऊन बसचालकाने नगरसेवकांना अर्वाच्य भाषा वापरली. या वादावादीचे रूपांतर अखेर मारहाणीत झाले.
प्रवेशद्वारावर घडलेली घटना समजताच प्रवाशांसह अनेक बघ्यांनी तेथे गर्दी केली. आगारातील कर्मचा-यांनी नगरसेवकांवर कारवाईच्या मागणीसाठी तात्काळ काम बंद आंदोलन छेडले. मोठी गर्दी जमल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत गर्दी पांगविली. सुमारे साडेतीन तास आंदोलन सुरू होते, मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर चालक शेख यांना वाहनातून पोलीस ठाण्यात नेण्यात आले व तेथे त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. पोलिसांनी कासट व वाकचौरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला. त्यानंतर आंदोलन मागे घेऊन कामकाज सुरळीत सुरू झाले.