लोकसभेप्रमाणेच विधानसभेतदेखील दमदार कामगिरी करीत भाजपने नागपुरातील सर्व सहा जागांवर कब्जा केला. मात्र लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतांची टकेवारी  घटली आहे.
लोकसभा निवडणुकीत नागपुरात ५ लाख ८७ हजार ७८७ एकूण मतदान झाले होते. त्यापैकी काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांना ३ लाख ९३९ मते पडली. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८६ हजार ८२८ मतांनी पराभव केला होता. मात्र विधानसभेत भाजपला ही मतांची आघाडी कायम टिकवता आली नसल्याचे दिसून येते.
लोकसभेत भाजप – शिवसेना युती होती आणि विधानसभेत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यामुळे हा फरक असल्याचे भाजपकडून दावा करण्यात येत आहे. भाजपची खालवत असलेली टक्केवारी पंतप्रधान मोदी यांच्या लाटेच्या परिणाम कमी होत असल्याचे संकेत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजपला १ लाख ५ हजार मते पडली होती तर काँग्रेसला ४४ हजार ५२८ मते मिळाली. येथे विधानसभा निवडणुकीत भाजपला ८१ हजार  २२४ मते मिळाली आहेत.
पूर्व नागपूर मतदारसंघात भाजपला लोकसभेत १ लाख १३ हजार मते घेता आली होती तर काँग्रेसच्या वाटय़ाला ४७ हजार मते आली होती. येथे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला येथे ९९ हजार १३६ हजार मते प्राप्त झाली आहेत. मध्य नागपूर मतदारसंघात गडकरी यांनी ९४ हजार १६४ मते मिळवली होती तर मुत्तेमवार यांना ५४ हजारांचा पल्ला गाठता आला होता. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला येथे ८७ हजार ३५६ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
लोकसभेत पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदरात ९३ हजार मते पडली होती आणि काँग्रेसला ५६ हजार मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला येथे ८६ हजार ५०० मते मिळाली आहेत. लोकसभेत दक्षिण-पश्चिम मतदारसंघात भाजपला १ लाख ६५ हजार ५२५ यांना मिळाली होती. काँग्रेसने  ४४ हजार मते घेतली होती. येथे विधानसभा निवडणुकीत १ लाख १३ हजार ९१८ मते भाजपला मिळाली आहेत. उत्तर नागपूर विधासभा मतदारसंघात गडकरी यांना ७४ हजार मते मिळाली होती तर मुत्तेमवार यांनी ५६ हजार मते मिळवली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला ६८ हजार ९०५ हजार मते पडली आहेत.