जिल्ह्य़ात पार पडलेल्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कळमेश्वर, उमरेड, कामठी, भिवापूर तालुक्यात भाजपची सरशी झाली असून मौदा तालुक्यात काँग्रेसला यश आले आहे.
उमरेड तालुक्यात १८ पैकी १० ग्रामपंचायतीवर भाजपसमर्थित उमदेवार सरपंचपदी निवडून आले. सूरगाव येथे राजू ढेंगरे सरपंच, महेंद्र भोयर उपसरपंच, पाचगाव येथे पुण्यशीला मेश्राम सरपंच, रामाजी हटवार यांची सरपंचपदी निवड झाली. मौदा तालुक्यात ३० पैकी १८ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. कोंढाली येथे राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व राखले आहे. सावनेर तालुक्यातील दहेगाव येथे किशोर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना चौधरी सरपंचपदी विराजमान झाल्या.
कळमेश्वर तालुक्यात २१ पैकी १४ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. भाजपला चार तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यात यश आले. तालुक्यातील सर्वात मोठय़ा धापेवाडा ग्रामपंचायतवर भाजपने सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत केदार गटाचा धुव्वा उडाला.
धापेवाडाच्या सरपंचपदी डॉ. मनोहर काळे तर उपसरपंचपदी सतीश मिश्रा यांची निवड झाली आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत केदार गटाचा धुव्वा उडाला. केवळ निंगा ग्रामपंचायतवर केदार गटाने वर्चस्व मिळविले. काँग्रेसचे सुभाष किरपाल यांची सरपंचपदी निवड झाली. तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतची निवडणूक स्थगित करण्यात आली. तहसीलदार दीपक कारंडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.  कोंढाळी परिसरात महिलाराज दिसून आले. या परिसरातील १३ ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांची निवड झाली.