मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये सुरू व्हावे, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सीपीआर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या सुमारे १५० जणांना पोलिसांनी अटक केली. आंदोलनामध्ये बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह वकीलही सहभागी झाले होते.    
कोल्हापूरमध्ये खंडपीठ सुरू व्हावे, ही गेली २५ वर्षांची मागणी आहे. या मागणीसाठी तीन महिन्यांपूर्वी वकिलांनी जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र समितीचेही कामकाज अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भाजपने खंडपीठाच्या प्रलंबित मागणीसाठी गुरुवारी सीपीआर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.     
सीपीआर चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी खंडपीठाच्या मागणीच्या जोरदार घोषणा दिल्या. पावसाच्या सरी कोसळत असतानाही आंदोलकांचा उत्साह कायम होता. बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव राणे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. प्रकाश हिलगे यांच्यासह वकिलांनी या आंदोलनात भाग घेतला. अ‍ॅड. राणे म्हणाले, वकिलांनी प्रदीर्घ काळ संघर्ष करूनही त्याची दखल घेतली जात नाही. खंडपीठासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने त्वरित अहवाल सादर करून खंडपीठ होण्याच्या मार्गाला चालना द्यावी.    
भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ झाल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हय़ातील पक्षकार व वकिलांना लाभ होणार आहे. लोकहिताच्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी मुंबईला माराव्या लागणाऱ्या फेऱ्या वाचणार आहेत. त्यासाठी नाहक खर्चही करावा लागणार नाही. मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.    
पोलिसांनी महेश जाधव, अशोक देसाई, मारुती भागोजी, अ‍ॅड. संपतराव पवार, सुरेश जरग, भारती जोशी, तेजस्विनी हराळे, अ‍ॅड. अनिता मंत्री यांच्यासह ५० महिला व १०० कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सुटका केली.