अंबरनाथच्या पूर्व विभागातील शिवाजी चौक ते वेल्फर सेंटर दरम्यानचे रस्ता काँक्रीटीकरणाचे काम वर्षभर रखडविणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे आश् वासन पालिकेचे मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत दिले. याप्रश्नी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
काँक्रीटीकरणासाठी शहरातील हा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांना बराच त्रास होत आहे. त्या खोदलेल्या जागेचा वाहनांची पार्किंग करण्यासाठी वापर केला जात आहे. काही व्यापाऱ्यांनी दिवाळीनिमित्त ग्राहकांनी थेट दुकानात यावे म्हणून चक्क लोखंडी पूल उभारून त्यावर रंगीत गालिचा टाकला आहे. संबंधित कंत्राटदारास पालिकेने आठ नोटिसा बजावल्या, परंतु तरीही त्याने काम सुरू न केल्याने आता त्याला काळ्या यादीत टाकून त्याची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक यशवंत जोशी, प्रदीप पाटील, राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील आदींनी या प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले होते.  
सानुग्रह अनुदान
पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साडेसहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. येत्या दोन दिवसांत सानुग्रह अनुदानाचे वाटप केले जाईल, असे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर केले.