सध्या नागपूर शहरात तांत्रिक बाबा उदंड झाले असून त्यांनी दिलेल्या आश्वासनाला भोळी-भाबडी जनता बळी पडत आहेत. या तंत्रिक बाबांच्या आश्वासनाला बळी पडून शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाले असून काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शासन, प्रशासन व अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी याचे काहीतरी करावे, अन्यथा अशा प्रकारास आणखी चालना मिळून भोळ्या भाबडय़ा जनतेंची मोठय़ा प्रमाणात लूट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भारतासारख्या गरीब देशात अनेक लोकांना नानाप्रकारच्या अडचणी आहेत. आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक, वैचारिक या समस्येने सर्वसामान्य जनतेला ग्रासलेले आहे. याशिवायही अनेक समस्या त्यांच्यापुढे ‘आ’ वासून उभ्या आहेत. अशिक्षित, धार्मिक व अंधश्रद्धेला बळी ठरलेल्या अशा व्यक्तीचे लक्ष नेमके विविध वृत्तपत्रात व विविध दूरदर्शन वाहिन्यात दाखवलेल्या जाहिरातीवर जाते आणि तांत्रिक बाबांच्या नेमक्या जाळ्यात अडकतो. धंदा, नोकरी, संतती, प्रेम, वशीकरण, चित्रपट, मुठकरणी, जादूटोणा इत्यादी सर्व प्रकारची कामे यशस्वी होईल, याची हमी जाहिरातीत दिली जाते. या समस्या ११ तास ते तीन दिवसांत सोडवल्या जात असल्याचा दावाही केला जातो. असे शक्य झाले नाही तर ग्राहकांना शुल्क परत देण्याचे आश्वासनही देतात. विशेष म्हणजे या तांत्रिक बाबांचा मोबाईल क्रमांक व इतर माहिती जाहिरातीत दिली जाते. असे असतानाही त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.
एकदा का व्यक्ती अशा बाबांच्या आहारी गेला की, बाबांनी म्हटल्याप्रमाणे तो वागत जातो. एक दिवस तो पूर्णपणे आर्थिक आणि मानसिकदृष्टय़ा उद्ध्वस्त होऊन जातो. अशा तांत्रिक बाबांनी समस्या निवारण्यासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तीन महिन्यापूर्वीच जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच एका तांत्रिक बाबाचा खून करण्यात आला मात्र, अशा दुर्देवी घटनेनंतरही तांत्रिक बाबांकडे जाणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली नाही. या तांत्रिक बाबांचा व्यवसाय बेकायदेशीर असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यास कुणीही पुढे येत नाही. एखाद्या महिलेवर तांत्रिक बाबाने बलात्कार केला की पोलीस व प्रशासन जागे होते. पांढरपेशा समाजात खूप चर्चा होऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जातो. या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच पुन्हा हा धंदा तेजीत चालतो. नागपुरातील अनेक भागात या तांत्रिक बाबांनी आपला अड्डा बनवला आहे. बाबा मियाँ-मुसा बंगाली, इंटरनॅशनल तांत्रिक बाबा, अशा प्रकारची अनेक नावे धारण करून हे तांत्रिक बाबा दररोज सर्वसाधारण दु:खी नागरिकांना बिनधास्तपणे लुटत आहेत. अशा तांत्रिक बाबांच्या नादी लागून शेकडो कुटुंब आर्थिक व मानसिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतरही या बाबांकडे होणारी गर्दी पाहून समाजातील भोळे भाबडय़ा नागरिकांची कीव आल्याशिवाय राहात नाही.  
 यासाठी प्रसारमाध्यमे जबाबदार -उमेशबाबू चौबे
अशा जाहीराती देणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही काही वृत्तपत्र अशा जाहिराती देत आहेत. अशा जाहिराती देऊ नये, अशी विनंती वृत्तपत्रांना निवेदने देऊन केली आहे. यानंतरही हा प्रकार बंद झाला नाही. अद्यापपर्यंत अशा प्रकरणात वृत्रपत्राच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. अ.भा. अंधश्रद्धा निमूलन समितीचे एक शिष्टमंडळ पुढील दोन तीन दिवसात जिल्ह्य़ाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे. अशा जाहिराती देणाऱ्या वृत्तपत्र व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर जादूटोणा कायद्याच्या कलम २ (घ) नुसार कारवाई करावी, अशी मागणी याप्रसंगी करणार असल्याची माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.