वसंतदादा कारखान्याला झालेली तथाकथित भूतबाधा काढण्यासाठी मंतरलेले नारळ ठिकठिकाणी बांधण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अंधश्रद्धेपोटी पिरॅमिड लावण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भूतबाधा हटविण्यासाठी घालण्यात आलेल्या पूजेला आक्षेप नोंदवित मंतरलेले नारळ व पिरॅमिड काढून टाकण्याची मागणी केली आहे.
आशिया खंडात सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना अशी ओळख सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची आहे.  ८ ऑक्टोबर १९५६ रोजी स्थापन झालेल्या या साखर कारखान्याने अनेक स्थित्यंतरे पाहत गेली ५८ वष्रे सांगलीचे राजकारण व अर्थकारण जवळून अनुभवले आहे.  पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या वसंतदादांचा कारखाना म्हणून अवघ्या सहकार क्षेत्राला या कारखान्याची ओळख आहे.
तथापि गेली काही वष्रे आíथक अडचणींमुळे कारखान्याची अवस्था आयसीयूमधील रुग्णासारखी झाली आहे.  सप्टेंबरपासून कामागारांचे वेतन नाही. गतवर्षी गाळपास आलेल्या उसाचा दुसरा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.  शेतकरी आंदोलनामुळे लांबलेला गाळप हंगाम सुरू होतो न होतो तोच कामगारांच्या चुकीमुळे बॉयलरमध्ये उसाचा रस गेल्याने पंधरा दिवस दुरुस्तीअभावी कारखाना बंद पडला.  या पाठीमागे कोणती तरी अघोरी शक्ती आहे असा समज काही मंडळींचा झाला. त्यातून अघोरी शक्तीची छाया हटविण्यासाठी जारणमारण विधी करण्याचा निर्णय घेऊन गेल्या सप्ताहात ४०० वर महिलांच्या उपस्थितीत पूजा घालण्यात आली.  यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचा दावाही करण्यात येत आहे. पूजेसाठी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या पत्नी ऐश्वर्या पाटील या उपस्थित होत्या.
पूजेनंतर कारखान्याच्या विविध कार्यालयांसह विविध विभागात सुमारे १५० नारळ लाल कापडात गुंडाळून दर्शनी भागात बांधण्यात आले आहेत.  प्रवेशव्दारापासून नारळ बांधण्यात आले आहेत.  याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील यांच्यासह माजी आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. के.डी.िशदे, प्रा. प.रा.आर्डे, माजी नगरसेविका ज्योती आदाटे आदींसह काही कार्यकर्त्यांनी जाऊन मुख्य लेखाधिकारी विक्रमसिंह सरनोबत यांच्याकडे अंधश्रद्धेबाबत आक्षेप नोंदविला.  कार्यालयातील पिरॅमिड काढण्याची मागणी करीत काही पिरॅमिड व नारळ स्वत काढले.  अद्याप बहुसंख्य ठिकाणी लाल कापडातील नारळ दर्शनी भागात दोरीने बांधल्याचे आढळून येत आहे.  याबाबत साखर सहसंचालकाकडे तक्रारही करण्यात आली असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.