वेकोलिच्या ३४ कोळसा खाणीतून उद्योगांना वितरित होणाऱ्या कोळशाचा काळाबाजार सुरू असून दगड, मातीमिश्रित कोळसा वीज केंद्र व खुल्या बाजारात तिप्पट दराने विकला जात आहे. राष्ट्रीय हरित लवाद, पुण्याच्या पश्चिम विभागाच्या निर्देशान्वये डेपोधारकांना कोळसा साठवणुकीची परवानगी नसतांनाही येथे खुलेआम साठवणूक व विक्री सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या सर्वावर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
केंद्रीय खते व रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्य़ातील कोळसा व्यापारी चोर असल्याचे व कॉंग्रेसचे विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी कोळसा चोरीला सत्ताधारी भाजपच्या नेत्यांची मदत असल्याचा आरोप केल्यानंतर आता कोळसा चोरी, तसेच स्थानिक उद्योग व महाऔष्णिक वीज केंद्रात माती व दगड मिश्रित पुरवठय़ाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय कोळसा मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे कॉंग्रेसने केली आहे. स्थानिक उद्योगांना दिलेल्या कोळशाची अवैध विक्री होत आहे. कोळशाच्या काळाबाजारात स्थानिक कोळसा व्यापारी सहभागी असल्याची तक्रार त्यांच्या नावांच्या यादीसह जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभागाच्या निर्देशान्वये डेपोधारकांना कोळसा साठवणुकीची परवानगी नसतांनाही कोसारा येथे मनीष चठ्ठा, नारायण स्कुलच्या बाजूला प्रकाश अग्रवाल, निलेश धरमकाटा, नागाळा येथे प्रकाश अग्रवाल, रामविलास अग्रवाल, सरबती काटा, मोरवा, विवेक जैन, सुनील भट्टळ, नरेश जैन, हरशद ठक्कर, सुरेश अग्रवाल, कैलाश अग्रवाल, राजेंद्र सिंग, आशिष जैन, क्रिष्णा रेड्डी, विवेक जैन, नागाळा येथे एन.डी.च्या ८ भूखंडांवर कोळसा साठवून आहे. श्रीनिवास रेड्डी, शाहकोल प्रायव्हेट लि., मोन्टू सेठ, बजरंग काटा, ताज काटा, रफीक भाई, नवल अग्रवाल, कमल अग्रवाल, श्याम अग्रवाल, बजरंग अग्रवाल, एस.सी.के.रेड्डी, नितीन उपरे, दीपक जयस्वाल, विमला इमप्रेरीयल प्रायव्हेट लि., विनित लुनिया, तिवारी बंधु, कैलाश अग्रवाल, शैलेश अग्रवाल, धर्मपाल अग्रवाल, राजू मालू, पवन अग्रवाल, रफीक मारफानी, चक्रेश जैन, सुरेंद्र जैन, जितेष अग्रवाल, विजय अग्रवाल, शिव जाजू, नंदलाल मालु, बनवारीलाल मालु, जुगल अग्रवाल, किशोर अग्रवाल व प्रदीप ठक्कर, अशी कोळसा डेपो मालकांची यादीच पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे. हे सारे कायद्याचे उल्लंघन करून खुल्या भूखंडांवर अवैध कोळसा साठवित आहेत. या कोळशात दगड, मातीमिश्रित करून खुल्या बाजारात विक्री करीत आहेत. या कोल डेपोंमुळे शहर प्रदूषित व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भूखंडांवर कोळसा साठवणूक कुणी करू नये, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग कार्यालयाने दिले होते. या आदेशाला केराची टोपली दाखवून हा सर्व प्रकार सुरू आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कोल डेपोधारकांवर कडक कारवाई झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भातील तक्रार थेट कोळसा मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे शहर कॉंग्रेस समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान, थेट कोळसा मंत्रालयात तक्रार झाल्याने कोळसा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.